पंढरपूरच्या भक्तनिवासात ‘व्हीआयपीं’चा कब्जा
By admin | Published: July 3, 2017 10:53 AM2017-07-03T10:53:41+5:302017-07-03T10:53:41+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर : सचिन कांबळे
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गोरगरीब भाविकांच्या राहण्याची सोय अल्पदरात व्हावी. या हेतूने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या भक्तनिवासांवर ऐन आषाढी यात्रा कालावधीत व्ही.आय.पी.नीं डाका टाकल्याने सर्वसामान्य भाविकांच्या निवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भक्तनिवासात त्यांना अल्पदरात जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांना खासगी लॉजकडे नाईलाजास्तव मोठ्या रकमा मोजाव्या लागत आहेत.
शहरात वर्षाकाठी भरणारे चार यात्रा सोहळे याशिवाय वर्षभर विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या कोट्यवधींच्या घरात असते. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारे भाविक सर्वसामान्य गरीब म्हणून परिचित आहेत. त्यांना पंढरपुरातील खासगी लॉज व अन्य निवासासाठी मोठी रक्कम मोजणे शक्य नसल्याने विठ्ठल मंदिर समितीने वेदांत, व्हिडीओकॉन भक्तनिवास ही निवासस्थाने स्वत:च्या खर्चातून व देणगीदारांच्या मदतीने भव्य स्वरुपात उभारलेली आहेत. या निवासस्थानातील खोल्या सर्वसामान्य भाविकांना अल्पदरात दिल्या जातात.
मात्र आषाढी यात्रा सोहळ्यामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर समितीच्या तिन्ही भक्त निवासस्थानांमध्ये मागणी करूनही खोल्या उपलब्ध नसल्याचे मार्मिक उत्तर ऐकावयास मिळत आहे. सर्वसामान्य भाविकांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानामध्ये व्ही.आय.पी. साठी तब्बल ६४ रुम बुक करण्यात आल्याचे मंदिर समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
-------------------
ते व्ही.आय.पी. कोण ?
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळांतील त्यांचे कॅबिनेट व राज्यमंत्री दर्जाचे सहकारी, अनेक सहकारी, शासकीय अधिकारी असा लवाजमा असतो. त्यांच्यासाठी बांधकाम विभागाच्या निवासस्थानासह जिल्हा परिषद, वीज वितरण, पाटबंधारे आदीच्या शासकीय निवासस्थानांमध्ये सोय केलेली असते. याशिवाय त्या-त्या पक्षांचे स्थानिक कार्यकर्त्यांचे अलिशान बंगले, फार्महाऊसमध्ये या मंत्री, आमदार व अधिकाऱ्यांची बडदास्त असते. असेल तर मंदिर समितीच्या गरिबांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानांवर ६४ रुम कोणत्या व्ही.आय.पी. साठी बुक करण्यात आल्या आहेत. हा प्रश्न अधांतरी आहे. त्यामध्ये कोण राहणार हे जाहीर करण्यास मंदिर समितीचे कर्मचारी तयार नसल्याने समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण झाले आहे.