बार्शीतून कार चोरली, पोलिसांनी माढ्यात पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:27 AM2021-08-17T04:27:54+5:302021-08-17T04:27:54+5:30
माढा / बार्शी : कामासाठी मित्राची कार वापरायला आणली होती. रात्री बार्शीतील फुले प्लॉट येथे घरासमोर लावलेली कार चाेरट्यांनी ...
माढा / बार्शी : कामासाठी मित्राची कार वापरायला आणली होती. रात्री बार्शीतील फुले प्लॉट येथे घरासमोर लावलेली कार चाेरट्यांनी पळविली. बार्शी पोलिसांनी चोरीला गेलेल्या कारची व संशयित आरोपीची माहिती सर्व पोलीस ठाण्याला कळविली. माढा येथे केलेल्या नाकाबंदीत संशयित आरोपी कारमधून भाडे घेऊन जाताना पोलिसांच्या तावडीत सापडला.
अमजद अन्वर शेख (३२, रा. बाशिंगे प्लॉट, बार्शी) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. बार्शी येथील भागवत क्षीरसागर यांची कार जफर शेख यांनी वापरायला घेतली होती. मात्र, रात्री उशीर झाल्याने गप्पा मारण्याच्या ओघात गाडीजवळ चावी राहिली. संशयित अमजद शेख याने एमएच ४५, सीएस ४१४१ क्रमांकाची कार चोरून नेली व उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे गेला. यावेळी काही अनोळख्या प्रवाशांचे भूम येथून सोलापूरला जाणाऱ्या प्रवासाचे भाडे घेऊन जात होता. ही माहिती मिळताच माढा पोलिसांनी नाकेबंदी केली. दुपारी कुर्डूवाडी बार्शी रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौक (ता.माढा) या ठिकाणी पोलीस हेडकॉन्स्टेबल देविदास शिंदे व फौजदार विष्णू खंडागळे हे तपासणी करताना त्यांना ती कार दिसली व यावेळी चौकशी केल्यावर अमजद अन्वर शेख यास ताब्यात घेतले. उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, पोलीस नाईक पांडुरंग देशमुख, पोलीस नाईक प्रणव शिंदे यांनी कारवाई केली. ननवरे, वरपे, बारगीर, घोंगडे व अर्जुन गोसावी या बार्शी पोलीस कर्मचाऱ्यांनी ते संशयित वाहन ताब्यात घेतले. मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील ट्रॅक्टरचे ३ ट्रेलर माढा पोलिसांनी जप्त करून संबंधितांच्या ताब्यात दिले होते.
............
डिझेलसाठी चोरीच्या कारमध्ये घेतला प्रवासी
प्रवाशांनाच गाडी चोरीची असल्याबाबत माहिती नसल्याने भाडे ठरवून कारमध्ये निघाले होते. संशयित आराेपी अमजद शेख याच्याकडे पैसे नव्हते. प्रवाशांकडूनच डिझेल भरण्यासाठी एक हजार रुपये घेतले होते व दोन किलोमीटर अंतरावरच पोलीस कारवाई झाल्याने त्या चार प्रवाशांना दुसऱ्या खासगी वाहनाच्या मदतीने माढ्यातून येऊन बसने आपला पुढील प्रवास करावा लागला.
............
फोटो ओळ : बार्शीतून चोरीला गेलेल्या कारसोबत संशयित आरोपीस अटक करण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस श्याम बुवा पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, देविदास शिंदे आजार शेख, बालाजी घोरपडे आदी उपस्थित होते.