कारंबा शिवारातील दरोडा उघडकीस, चार आरोपींना केले जेरबंद
By appasaheb.patil | Published: February 24, 2019 05:09 PM2019-02-24T17:09:22+5:302019-02-24T17:10:58+5:30
सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारंबा शिवारातील दरोडा उघडकीस आणण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ...
सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कारंबा शिवारातील दरोडा उघडकीस आणण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे़ या दरोड्यात वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनासह ३८ हजार ८२५ रुपये किमतीच्या स्टीलच्या सळया असा २ लाख ७ हजार ८२५ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना जेरबंद केले आहे.
भीमाशंकर हणमंतू ठणकेदार (वय ३७, रा़ मड्डी वस्ती, जुना तुळजापूर नाका, सोलापूर), रामा उर्फ रामचंद्र चंदू काळे (वय ३०, रा. नरोटेवाडी, ता़ उ़ सोलापूर), किरण शिवाजी काळे (वय २५), सुखदेव शिवाजी काळे (वय २८, रा़ मार्डी, ता़ उ़ सोलापूर) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कारंबा (ता़ उ़ सोलापूर) येथील दत्तात्रय अण्णाप्पा बहिर्जे (वय ५८) यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू होते़ २ फेबु्रवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात वीस ते तीस वयोगटातील अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण व शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ३८ हजार ८२५ रुपये किमतीच्या स्टीलच्या सळया जबरीने घेऊन गेले होते़ याबाबत दत्तात्रय बहिर्जे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी हे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्यात अज्ञात आरोपींच्या मागावर होते़ त्याच दरम्यान, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मड्डी वस्ती येथील भिमाशंकर ठणकेदार यास १९ फेबु्रवारी रोजी ताब्यात घेतले़ भिमाशंकर ठणकेदार याची कसून चौकशी करण्यात आली़ त्यावेळी अन्य नावे सांगितली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत भंगाळे हे करीत आहेत.
सोमवारपर्यंत कोठडी
- दरोडा टाकणाºया चौघा आरोपींना सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्यांना २५ फेबु्रवारी २०१९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.