सावधान; हेल्मेटशिवाय आरटीओ कार्यालयात दुचाकीस्वारांना प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 12:46 PM2020-03-02T12:46:48+5:302020-03-02T12:48:27+5:30
आजपासून मोहिम; सकाळच्या सत्रात झाली दुचाकीस्वारांवर कारवाई
सोलापूर : आरटीओ कार्यालयात कामानिमित्त मोटरसायकलवर जातायं. सावधान... आता आरटीओ कार्यालयात हेल्मेटशिवाय मोटरसायकलस्वारांना प्रवेश नाही. सोमवारपासून ही बंदी लागू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी २४ जणांना दणका बसला आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी याबाबत शुक्रवारीच फतवा काढला आहे. सोमवारपासून आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त येणाºयांना हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे. यानुसार सकाळी ९. १५ वा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे प्रवेशद्वारावर येऊन थांबले. इतर अधिकारी थोड्याच वेळात दाखल झाल्यावर पावणेदहा वाजेपासून अचानकपणे कारवाई सुरू करण्यात आली. प्रवेशद्वारातून आत येणाºया विनाहेल्मेट मोटरसायकलस्वारांना पकडण्यात आले. दुपारी बारा वाजेपर्यंत २४ दुचाकीस्वार विनाहेल्मेट आढळले. त्यांची वाहने ताब्यात घेऊन मेमो देण्यात आला. कागदपत्रांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दंड भरल्यानंतर हेल्मेट दाखविल्यावर ही वाहने सोडण्यात येणार आहेत.
अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व दुचाकीस्वाराच्या सुरक्षिततेसाठी शासनाने हेल्मेट सक्ती केली आहे. पण वाहतूक पोलीस व आरटीओ विभागातर्फे वारंवार मोहीम घेऊनही नागरिक याबाबत सतर्क दिसत नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकाºयांत येणाºयां दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती केली होती. पण हा प्रयोग फार काळ टिकला नाही. त्याचबरोबर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी विनाहेल्मेट दुचाकीवर जाणाºया पोलिसांचे फोटो व्हॉटसपवर पाठवा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असे जाहीर केले होते. याबाबत वाहतूक शाखेतर्फे व्हाटसप नंबरही प्रसिद्ध केले होते. पण ही मोहीमही थंड पडल्याची चर्चा असतानाच आता आरटीओ कार्यालयाने हेल्मेट सक्की लागू केली आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडे जात असतानाच हेल्मेटबाबत खातरजमा करा, अन्यथा मोठा दंड होऊ शकतो.
---------
कायद्याने स्वयंचलीत दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती आहेच. पण याबाबत नागरिकांना गांभीर्य दिसत नाही. आरटीओ व वाहतूक पोलिसांतर्फे मोहीम घेण्यात येत आहेत. सध्या नवीन अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले असल्याने अडचण येत आहे. पण आता आरटीओ कार्यालयापासूनच ही शिस्त राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
संजय डोळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.