वाहकाला सापडलेले पैशाचे पाकीट वृद्धाला केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 01:05 PM2019-12-21T13:05:51+5:302019-12-21T13:10:05+5:30
माणुसकी आजही जिवंत; एस.टी.चे कंडक्टर-चालकाचा प्रामाणिकपणा
सोलापूर : सरका.. सरका़.. पुढं सरका.. मला आत येऊ द्या़.. तात्या़.. अण्णा़.. बापूजी पुढं सरका़.. तो पायरीवर उभे राहून बसचा दरवाजा बंद करतो. दोन-तीन वेळा शिट्टी फुंकतो. थोडा गोंधळ कमी होतो़.. कंडक्टर बोलायला सुरुवात करतो. अशाप्रकारे एस.टी.चे कंडक्टर-चालक नित्याचेच काम करत असतात. पण कर्तव्य बजावत असताना आपल्यातील माणुसकी पण जपत असतात.
आपल्या कर्तव्यात कोणताही कसूर न करता एसटी वाहक आणि चालकांनी प्रामाणिकपणा दाखवून एका वृद्ध नागरिकाच्या पैशाचे पाकीट परत केले. त्यामुळे एसटीचा प्रवास आजही सुरक्षित असल्याचे यावरून दिसून आले आहे. त्याचं झालं असं की.. अक्कलकोट डेपोच्या चुंगी-अक्कलकोट बसमध्ये चुंगी येथील प्रवासी चढला़ बुधवार अक्कलकोटचा आठवडा बाजार असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी गर्दी झाली़ एस.टी. बस अक्कलकोटच्या दिशेने निघाली़ एस.टी़चे चालक शिंदे व वाहक मोहरकर यांनी बसमधील गर्दीतून वाट काढत नेहमीप्रमाणे प्रवासांचे तिकीट काढत पुढे जात आपली कामगिरी बजावतं होते.
सकाळची बस वेळेवर आली. सर्व प्रवासी खाली उतरून आपल्या मार्गी निघाले. वाहक शशिकांत मोहरकर (वाहक क्रमांक -११८०८६) यांनी नेहमीप्रमाणे पूर्ण बस चेक करत असतानाच एका सीटवर एक पाकीट दिसले़ ताबडतोब हातात घेऊन पाहिले तर त्यात आधार कार्ड, फोटोसह जवळजवळ ११,१४० (अकरा हजार एकशे चाळीस रुपये) रोख रक्कम होती. कुठल्या तरी बसमधील प्रवाशाचे पाकीट असणाऱ़़ पण सर्व प्रवासी उतरून गेले होते. कुणाला विचारणार म्हणून वाहक मोहरकर यांनी ताबडतोब अक्कलकोट बसस्थानकांतील वाहतूक नियंत्रण अधिकारी परास यांना सर्व हकिकत सांगून त्यांच्या ताब्यात पैशांनी भरलेले पाकीट दिले. चुंगी येथील प्रवासी आहेत, कोणी आले तर त्यांना द्या म्हणून सांगून निघून गेले.
थोड्या वेळाने संबंधित व्यक्ती चुंगी येथील रहिवासी नागुशा बनपट्टे यांनी चौकशी केली. माझं पाकीट हरवल्याची खात्री पटली़ त्यानंतर पाकिटासह रोख रक्कम, कागदपत्रे त्यांच्याकडे देण्यात आली. वाहक शशिकांत मोहरकर यांना बोलावून घेऊन वृद्ध व्यक्ती नागुशा बनपट्टे यांनी आभार व्यक्त केले. नागुशा बनपट्टे व त्यांच्या पत्नीने शशिकांत मोहरकर यांना आशीर्वाद दिले. ‘खूप चांगले काम केलास़..बाबा सुखी आनंदात राहा’ असा आशीर्वाद दिला. बनपट्टे हे बक्षीस देत होते, पण मोहरकर यांनी नाकारले़ तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी मोठे बक्षीस असल्याचे म्हणाले़
सर्वत्र कौतुक
- वाहक शशिकांत मोहरकर व चालक शिंदे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शशिकांत मोहरकर वागदरीचे आहेत. कोकणात दापोली येथे कार्यरत असतानाच मागे एकदा पैशांनी भरलेली बॅग परत केली होती़ एस.टी़ महामंडळात प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहेत, म्हणून एसटीचा प्रवास आजही सुरक्षित असल्याचे यावरून दिसून आले़