मुंबईकरांच्या सेवेसाठी सोलापूर आगाराचे चालक अन् वाहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 01:22 PM2020-10-05T13:22:33+5:302020-10-05T13:24:45+5:30
मास्क अन् वर्दीची साथ; राजधानीत चालल्याचा आनंद
सोलापूर : मुंबईमध्ये सध्या लोकल सेवा बंद आहे. तेथे ‘बेस्ट’वर प्रवाशांचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी राज्यभरातील एक हजार एसटी गाड्या या मुंंबईकडे जात आहेत. यासाठी सोलापूर विभागातील १०० गाड्यांसह कर्मचारी वर्गही सज्ज झाला आहे.
सोलापूर विभागातील ९ आगारातून १०० गाड्या पाठवून देण्याच्या सूचना एसटी महामंडळाने केलेली आहे यामुळे सोलापुरातील काही गाड्या शनिवार आणि रविवारी मुंबई येथे दाखल झाल्या.
मुंबईकरांना सेवा देण्यासाठी अहमदनगर, सातारा, सोलापूर, धुळे, रत्नागिरी, सांगली, बीड, कोल्हापूर या विभागातून प्रत्येकी १०० गाड्या पाठवण्यात येणार आहेत. या गाड्यांसोबत कर्मचारीही पाठवण्यात येत आहेत.
या कर्मचाºयांची राहण्याची व्यवस्थाही तेथेच करण्यात आलेली आहे यामुळे कर्मचारीही तयारीनेच मुंबईत दाखल झाले आहेत. एका गाडीसोबत दोन चालक, दोन वाहक ही गेलेले आहेत. सोबतच मेकॅनिकची टीम आहे. बेस्टची सेवा बेस्ट करण्याचा निर्धार चालक, वाहकांनी केला आहे.
मुंबईकरांच्या सेवेसाठी जात असल्याचा आनंद
कोरोनाची सध्या जास्त भीती मनात आहे; पण तरीही मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही जात असल्याचा जास्त आनंद आहे. यासाठी आम्ही पुढील आठ दिवसांची तयारीही केली आहे. घरून जाताना मास्क आणि सॅनिटायझर आम्ही घेतलेले आहे, असे मत चालक अमर भोसले यांनी व्यक्त केले.
मुंबईमध्ये किती दिवस लागतील हे माहीत नाही; पण आम्ही जाताना फक्त वर्दी घेतलेली आहे. दोन दिवस टिकेल अशी भाकरी, पिठलं असे पदार्थ घेतले आहेत. कोरोनामुळे सुरक्षेच्या साहित्याला प्राधान्याने घेतले आहे.
-गौरीशंकर चिलगुंडे,
चालक