हौस म्हणून बंदुका बाळगतात; स्वसंरक्षणासाठी परवाने मिळतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:56 PM2021-07-08T16:56:56+5:302021-07-08T16:57:07+5:30

सोलापूर शहरात ५५० परवाने : ग्रामीण भागात ६ हजार ४७२ जणांकडे शस्त्र

Carry guns as a hobby; Get licenses for self-defense! | हौस म्हणून बंदुका बाळगतात; स्वसंरक्षणासाठी परवाने मिळतात !

हौस म्हणून बंदुका बाळगतात; स्वसंरक्षणासाठी परवाने मिळतात !

googlenewsNext

सोलापूर : अलीकडे स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्यापेक्षा फॅशन म्हणूनच शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढतेय. सोलापूर जिल्ह्यात तब्बल ७ हजार २२ जणांकडे बंदूक परवाने आहेत. शहरात ५५०, तर ग्रामीण भागात ६ हजार ४७२ जणांकडे शस्त्र परवाने आहेत.

सध्याच्या काळातही बंदूक वापरण्याची हौस अनेकांमध्ये आहे. यातूनच प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण आलेल्या अर्जांची छाननी करून पोलिसांकडून अहवाल आल्यानंतर परवाना मिळण्याचे प्रमाण कमी आहे. परवाना घेतलेल्या बंदुकीच्या माध्यमातून नाहक कुणाला तरी धमकावणे, दहशत निर्माण करणे, हवेत गोळीबार करणे अशाप्रकारे गैरवापरही होण्याची शक्यता असते. असे प्रकार झाल्यास चौकशी करून संबंधिताचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येते. पोलीस आणि महसूल प्रशासन तातडीने संबंधिताचा बंदूक परवाना रद्द करते.

शस्त्र परवाना काढायचा कसा?

बंदूक या शस्त्र परवान्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो. हा अर्ज पोलिसांच्या विशेष शाखेकडे पाठवण्यात येतो. तेथून अर्जदार कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्या पोलीस प्रशासनाकडे तो अर्ज जातो. अर्जदाराची चौकशी करून अहवाल जिल्हा पोलीस प्रमुखांकडे येतो. त्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे येतो. त्यानंतर जिल्हाधिकारी परवाना देण्यासंबंधीचा निर्णय घेेतात.

शस्त्र सांभाळणे कठीण

  • १ परवाने असलेल्या शस्त्राद्वारे इतराने गुन्हा केल्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे ते सांभाळणेही तेवढेच कठीण काम आहे.
  • २ शस्त्र परवाना ज्यांच्यानावे आहे, त्यांनी सुरक्षितपणे शस्त्र सांभाळणे महत्त्वाचे आहे.
  • ३ निवडणुकांच्या कालावधीत परवानाधारी शस्त्र जमा करावे लागते. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा ते पोलिसांकडून परत आणावे लागते.

 

नियम आणखी कडक करण्याची आवश्यकता

जिल्ह्यात सध्या सात हजार २२ शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. परवाने घेणाऱ्यांमध्ये बहुतांश जण हे व्यावसायिक आणि राजकारणी असतात. परवाना मिळण्यासाठी असलेली प्रक्रिया किचकट असली तरी, आणखी नियम कडक करणे गरजेचे आहे. खरी गरज असेल त्यालाच परवाना मिळणे गरजेचे आहे. मात्र, अनेक जण फॅशन म्हणून परवाना घेत आहेत, यावर जरब हवी.

-----------

तालुकानिहाय परवान्यांची संख्या...

पंढरपूर - ७४४

अक्कलकोट - ७२०

सांगोला - ७०४

माळशिरस - ६८९

मंगळवेढा - ४०९

दक्षिण सोलापूर - ५१३

  • उत्तर सोलापूर - ४८०
  • मोहोळ - ५४०
  • करमाळा - ४४३
  • बार्शी- ५९०
  • माढा - ६४०
  • सोलापूर शहर - ५५०

-----

Web Title: Carry guns as a hobby; Get licenses for self-defense!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.