पुतण्याच्या डोळ्यादेखत वाहनाने नेले ५० फूट फरफटत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:24+5:302020-12-16T04:37:24+5:30
पंढरपूर : पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी व व्यायामासाठी निघालेल्या स्वत:च्या काका व काकूला चारचाकी वाहन ५० फूट फरफटत नेत ...
पंढरपूर : पहाटेची शुद्ध हवा घेण्यासाठी व व्यायामासाठी निघालेल्या स्वत:च्या काका व काकूला चारचाकी वाहन ५० फूट फरफटत नेत असल्याचे चित्र पाहण्याची वेळ अजिंक्य नामदेव बारले या पुतण्यावर आली. ही घटना मंगळवारी (दि. १५) पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. यामध्ये जयश्री बारले यांचा मृत्यू झाला आहे.
पंढरपूर येथे प्रकाश बारले यांचा २० वर्षापासून विठ्ठल दर्शन मंडप परिसरात प्रासादिक वस्तू विक्रीचं दुकान आहे. प्रकाश आदिनाथ बारले (वय ५४) व जयश्री प्रकाश बारले (वय ५०, दोघे रा. गोविंदपुरा, पंढरपूर) हे चंद्रभागा नदीच्या पलिकडे ६५ एकर परिसरात व्यायमासह फिरण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. त्यांच्याबरोबर अजिंक्य नामदेव बारले (वय ३३) व स्मिता अजिंक्य बारले (वय ३०) हे दोघेही त्यांच्या दुचाकीवरून जात होते. दोन वाहनांमध्ये १५ ते २० फूट अंतर होते. ते चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावरील मध्यावर आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बिगरनंबरच्या चारचाकी वाहनाने अजिंक्य बारले यांच्या वाहनाला कट मारून समोरील प्रकाश बारले यांच्या दुचाकीला धडक दिली. अन् क्षणातच जयश्री यांना काळाने ओढून नेले. त्या जागीच गतप्राण झाल्या. पती प्रकाश यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना सोलापूरला उपचारासाठी नेले आहे. त्याच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
तरी त्यांना आली नाही दयाप्रकाश बारले यांच्या वाहनाला धडक देणाऱ्या वाहनामध्ये थोडी वाळू, खोऱ्या व पाट्या आढळून आल्या. धडक दिल्यानंतर प्रकाश व जयश्री हे दोघे गंभीर जखमी झाल्याचे पाहूनही त्या ठिकणच्या लोकांनी धडक देणाऱ्या त्या व्यक्तींना त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत करा, अशी विनंती केली. मात्र चारचाकीतील व्यक्तींना जराही दया आली नाही. त्यांनी तत्काळ तेथून पळ काढला.
अनेकांना झाला असता धोका
चंद्रभागा नदीवरील नवीन पुलावर गोविंदपुरा, आंबाबाई पटांगण, व्यासनारायण झोपडपट्टी व प्रदक्षिणा मार्ग आदी परिसरातील नागरिक पहाटे फिरण्यासाठी येतात. यामुळे नवीन पुलावर दररोज पहाटेच्या वेळी गर्दी असते. त्याचवेळी त्याठिकाणावरून अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने जातात. प्रकाश बारले यांचा अपघात झाला यावेळीदेखील पुलावर गर्दी होती. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात पडला होता. मात्र सुदैवाने कोणालाही कसलीच इजा झाली नाही.