तात्पुरत्या मनाईच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय : दीपक आहेरकर यांच्यावरील कारवाई प्रकरण
By Admin | Published: May 8, 2014 10:22 PM2014-05-08T22:22:49+5:302014-05-09T00:14:49+5:30
सोलापूर :
सोलापूर :
शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्ट, सोलापूरचे मानद सचिव दीपक आहेरकर यांना पदावरून काढून टाकल्यानंतर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे, अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्ट, सोलापूरच्या मानद सचिव पदावर दीपक आहेरकर यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र दीपक आहेरकर यांनी पदाचा गैरवापर केल्याने दि.९ जून २0१२ च्या सभेत कायदेशीर ठरावाने त्यांचे मानद सचिव पद काढून घेण्यात आले होते. दरम्यान त्यांनी दि.६ जून २0१२ रोजी दिवाणी न्यायालयात पदावरून काढून टाकू नये म्हणून दावा दाखल केला होता, मात्र त्यांनी याची माहिती ९ जूनच्या सभेत दिली नव्हती किंवा सदस्यांनाही सांगितले नव्हते. त्यामुळे सभेत रिक्त झालेल्या पदावर डॉ. प्रदीप कोठाडिया यांची ट्रस्टचे मानद सचिव म्हणून नेमणूक केली आहे. दीपक आहेरकर यांच्या दाव्यामुळे त्यांच्यावरील कारवाईला प्रमुख जिल्हा न्यायाधीश आश्विनकुमार देवरे यांनी तात्पुरत्या मनाईचा आदेश दि.११ एप्रिल २0१४ रोजी दिला आहे. या निर्णयाच्या विरूद्ध संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करून घेतले होते. त्यावर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या मनाई आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या खटल्यात संस्थेतर्फे ॲड. शहा यांनी काम पाहिले तर दीपक आहेरकर यांच्यातर्फे ॲड. विनित नाईक, ॲड. आय.एम. खैरदी हे काम पहात आहेत. (प्रतिनिधी)