सार्वजनिक कार्यक्रमात तलवार फिरवल्याबद्दल हिंदू राष्ट्र सेनेच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By विलास जळकोटकर | Published: December 26, 2023 04:20 PM2023-12-26T16:20:32+5:302023-12-26T16:22:41+5:30
जेलरोड पोलिसांनी अखेर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह आयोजक रवी गोणेवर शस्त्र बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
विलास जळकोटकर, सोलापूर : जेलरोड पोलिसांनी अखेर हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईसह आयोजक रवी गोणेवर शस्त्र बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर शहरातील कर्णिक नगर मैदानावर रविवारी सायंकाळी धनंजय देसाई यांच्या हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने हिंदू गर्जना सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत भाषण सुरू करण्याअगोदर धनंजय देसाई यांनी नंगी तलवार दाखवून सभेत भाषण सुरू केले होते.
हिंदू राष्ट्र सेनेचे सोलापूर शहर संपर्क प्रमुख रवी गोणे यांनी व्यासपीठावर तलवार आणून दिली होती. जेलरोड पोलिसांनी खात्री करून अखेर शस्त्र बंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार धनंजय देसाई (रा.पौंड,ता.मुळशी,जि पुणे) व आयोजक रवी गोणे (रा सोलापूर) या दोघांवर तलवार दाखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई हे रविवारी सायंकाळी सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील मैदानात हिंदू गर्जना सभेसाठी आले होते. सोलापुरातील हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख रवी गोणे यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर धनंजय देसाई हे आले असता, रवी गोणे(रा.सोलापूर) यांनी तलवार आणून दिली. धनंजय देसाई (रा,पौंड,ता.मुळशी,जि पुणे) यांनी म्यान मधून तलवार काढून सभेतील प्रेक्षकांना उंचावून दाखवले. जेलरोड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी रविवारी सायंकाळी तैनात केला होता.
आदेशाची पायमल्ली :
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आयोजकांना विविध नियमावली पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरी देखील हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे आणि धनंजय देसाई यांनी तलवार दाखवून पोलीस नियमांचं उल्लंघन केले त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.