पोलीस दलाची बदनामी करणाऱ्या बार्शीच्या सराफावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:22 AM2021-05-10T04:22:03+5:302021-05-10T04:22:03+5:30
या प्रकाराच्या चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार बार्शी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांची नियुक्ती केली. ...
या प्रकाराच्या चौकशीसाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार बार्शी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांची नियुक्ती केली. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्यात पोलीस निरीक्षक यांनी कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस उपअधीक्षकांनी फिर्याद देताच सराफ व्यापारी अमृत चांदमल गुगळे यांच्याविरुद्ध भादंवि ५००, ५०५ १ व ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडूून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी आहे. असे असताना १७ एप्रिल रोजी गस्तीवरील पोलिसांना चांदमल ज्वेलर्स दुकान या आदेशाचे उल्लंघन करून सुरू असल्याचे दिसले. त्याच दिवशी दुकानातील उपस्थित मालक अमृतलाल गुगळे याच्यावर पोलीस वशिष्ठ घुले यांनी आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग, कोविड १९ विनिमय कायद्यानुसार गुन्हा दाखल केला व दुकान ३० दिवसांसाठी सील केले.
त्यानंतर सराफ गुगळे यांनी १८ एप्रिल रोजी स्वत:ची व्हिडीओ क्लिप प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली. त्यात त्यांनी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी गुगळे यांच्या मित्रांकडे त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली, त्यास गुगळे यांनी नकार दिला. त्यानंतर पोलीस निरीक्षक गिरीगोसावी गुगळे म्हणाले, आम्हाला गृहमंत्र्यांपर्यंत हप्ते पोहोचवावे लागतात, असा व्हिडीओ क्लिपमध्ये उल्लेख केला होता.
त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश फिर्यादी यांना दिले होते.
कारवाईतील सहभागींचा नोंदविला जबाब
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली असता पोलीस निरीक्षक, कारवाईतील सहभागी पोलीस अंमलदार, गुगळे यांच्यासाठी भेटलेले पत्रकार मित्र व राजकीय व्यक्ती राजेंद्र गायकवाड यांचे जबाब नोंदवले. तेव्हा पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले. आपल्यावरील कारवाई टाळली जावी यासाठी पूर्वदूषितपणे पोलिसांची बदनामी होईल, अशी व्हिडीओ क्लिप समाज माध्यमात प्रसारित करून महाराष्ट्र पोलीस दलाची, गृहमंत्री, गृहविभागाची जाणीवपूर्वक बदनामी केली म्हणून अमृतलाल गुगळे याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीत धाराशिवकर यांनी म्हटले आहे.