मोहोळ येथील गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण; म्हस्के डॉक्टरवर होता महिन्यापासून ‘वॉच’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:35 PM2019-03-06T12:35:09+5:302019-03-06T12:37:01+5:30
मोहोळ : विहान हॉस्पिटलवर गर्भलिंग निदान चाचणी करताना टाकलेला सापळा यशस्वी झाला असून, पीसीपीएनडीटी (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग ...
मोहोळ : विहान हॉस्पिटलवर गर्भलिंग निदान चाचणी करताना टाकलेला सापळा यशस्वी झाला असून, पीसीपीएनडीटी (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यानुसार डॉ. सत्यजित म्हस्के, मध्यस्थी करणारी महिला, रिक्षा चालक अशा तिघांवरही ७ मार्च रोजी न्यायालयात गुन्हा दाखल करणार असून त्यांच्यावर एका महिन्यापासून वॉच होता असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कारवाईवेळी या तिघांनी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विहान हॉस्पिटलमधील सोनोग्राफीची मशीन व संबंधित रेकॉर्ड असा सुमारे पाच लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सील करण्यात आला होता. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंदूरकर यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची भेट घेतली. विहान हॉस्पिटलवर झालेली कारवाई ही योग्य असून, त्यासाठी आमचे पथक गेल्या महिनाभरापासून संबंधित मध्यस्थी महिला माया अष्टूळ हिच्यावर पाळत ठेवून होते.
त्यानुसार डॉ. म्हस्के यांच्या हॉस्पिटलमध्ये वरील तिघेही अनधिकृतरित्या गर्भलिंग निदान चाचणी करताना आढळले. त्यांच्यावर दिनांक ७ मार्च रोजी मोहोळ येथील न्यायालयात पीसीपीएनडीटी या गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे डॉ. अंदूरकर यांनी पत्रकारांना सांगितले.
यावेळी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, विधी अधिकारी रामेश्वरी माने आदी उपस्थित होते.