खंडणी प्रकरणी पंढरीत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:47 PM2020-01-27T22:47:53+5:302020-01-27T22:47:57+5:30
काही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
पंढरपूर :- शहरातील व्यापाऱ्याला एक लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सुरज केरप्पा पडवळकर ( वय-२५, धंदा -उद्योग व्यापार, रा. भोसले चौक पंढरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर सुरवसे , ज्ञानेश्वर कडलासकर उर्फ महाराज , वैभव फसलकर , सचिन आवताडे आणि इतर ३ ते ४ अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय .
पडवळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीचा मित्र वैभव फसलकर याचा मेव्हणा ज्ञानेश्वर कडलासकर याच्याशी तोंड ओळख होती. ज्ञानेश्वर याने फिर्यादी पडवळकर याने घेतलेली नवी दुचाकी चक्कर मारून येतो म्हणून घेवून गेला. आणि परत दिली नाही. यावर पडवळकर यांनी घडला प्रकार आपला मित्र वैभव याच्या कानावर घातला . मात्र वैभव फसलकर याने पडवळकर याला शिवीगाळ केली.
त्यानंतर सदरची मोटारसायकल नवीपेठ भागात शंकर सुरवसे याच्याकडे दिसून आली. सुरवसेला दुचाकी मागीतली असता त्यानेही ती परत देण्यास नकार दिला म्हणून पडवळकर याने दुसऱ्या चावीने सदरची दुचाकी शंकर सुरवसेच्या घरासमोरून ताब्यात घेतली.
सदरचा प्रकार मिटवण्यासाठी सुरवसे, फसलकर , कडलासकर आणि आवताडे यांनी पडवळकरला प्रांत कार्यालयासमोर बोलावून घेतले.
आज सोमवारी सकाळी पडवळकरच्या घरी वरील आरोपी आले. त्यांनी पडवळकरला बोलेरो जीप मधून सांगोला रोड कडे निघाले . जात असताना त्यांनी पडवळकरला मारहाण करुन एक लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. अखेर दहा हजार रुपये घेवून प्रकरण मिटवण्यात आले. सचिन आवताडे हा पैसे मोजत असताना फिर्यादी पडवळकर आरोपींची नजर चुकवून पळून गेला. यातील काही आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.
या प्रकरणी भादविक ३६४(अ), ३८५,३८६,३८७,१४३,१४७,१४९,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल केली असल्याची माहिती पो. नि. दयानंद गावडे यांनी दिलीय. पुढील तपास स. पो. नि . करे हे करीत आहेत .