करमाळ्यात माजी आमदार पुत्रासह पाच जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:46 IST2025-04-01T16:46:43+5:302025-04-01T16:46:59+5:30
शंभूराजे जगताप, विशाल शिंदे आणि इतर पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.

करमाळ्यात माजी आमदार पुत्रासह पाच जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
करमाळा : माजी आमदार पुत्रासह पाच जणांवर चोरीच्या वाळू प्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून करमाळा पोलिसांत शनिवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमोल रंदील यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी शंभूराजे जगताप, विशाल शिंदे, इतर पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोघे बोरगाव, ता. करमाळा येथील सिना नदीपात्रातून वाळू गोण्यामध्ये भरून ट्रॅक्टरमधून चोरी करताना आढळून आले. याप्रकरणी तलाठी रोहन बोराडे वाळू चोरीबाबतची कारवाई करत असताना आरोपी वाळू चोरीतील ट्रॅक्टर घेऊन गेले. पोलिस व तलाठी यांना तुम्ही वाळू चोरी रोखणारे कोण? तुमचा येथे येण्याचा संबंध काय? असे म्हणून धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पी. बी. टिळेकर करीत आहेत.
दरम्यान, "या प्रकरणात आरोपी शेतकरी हा स्वतःच्या घराच्या कामासाठी दहा सिमेंटच्या गोण्यामध्ये दुचाकीवरून वाळू घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. पकडलेल्या वाळूची रीतसर दंड भरण्याची तयारी दाखवूनही पोलिसांनी आरोपीकडून पैसे खाल्ले, ते परत करा असे म्हटल्याने, चिडून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे," असा आरोप गुन्हा दाखल झालेल्या शंभूराजे जगताप यांनी केला आहे.