राष्ट्रवादीच्या या आमदाराचा जातीचा दाखला बोगस; शिवसेनेना घेतला आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 03:15 PM2020-08-29T15:15:49+5:302020-08-29T15:15:56+5:30
मोहोळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; नागपूर खंडपीठात याचिका दाखल होणार
सोलापूर : खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट जातीचा दाखला प्राप्त करून आमदार यशवंत माने यांनी शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे़ संबंधित आमदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा व कोर्टाने जातपडताळणी समितीने उचित कारवाई करून त्यांचे आमदारपद काढून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेचे सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली.
दरम्यान, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जाती गटातून निवडणुकीस उभे होते़ शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यांनी पराभव करून विजयी झाले़ त्या निवडणुकीसाठी दाखल केलेला जातीचा दाखला हा बनावट कागदपत्रांच्या आधारावर मिळविला आहे़ आमदार माने हे हिंदू कैकाडी जातीचे असून, ही जात विदर्भात जाती संवर्गात येते. मात्र उर्वरित महाराष्ट्रात विमुक्त जाती संवर्गात आहे.
माने हे इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी आहेत़ मात्र त्यांनी स्वत:च्या जातीचा दाखला चिखली (ता़ चिखली, जि. बुलडाणा) येथील रहिवासी असल्याची बनावट कागदपत्रे देऊन मिळविला.
मोहोळ मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असताना माने या प्रवर्गात येत नसताना त्यांनी बनावट कागदपत्रे जमा करून जातीचा दाखला मिळविला़ ही एकप्रकारे शासनाची व जनतेची फसवणूक व अनुसूचित जातीच्या सदस्यांवर अन्याय करणारी बाब आहे़
तरी संबंधित मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयाने व जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने माझ्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. माझ्याविषयी केलेल्या तक्रारीची मला कल्पना नाही़ तक्रारदारांनी माझ्यासमोर येऊन तक्रार सांगितल्यास मी कसा बरोबर आहे ते सांगेऩ मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने सध्या या विषयावर बोलणे टाळतो़ याबाबत नंतर उत्तर देईऩ
- यशवंत माने, आमदार, मोहोळ
आमदार यशवंत माने यांनी बनावट जातीच्या दाखल्याद्वारे जनतेची व शासनाची फसवणूक केली आहे़ याबाबत मोहोळ पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच नागपूर खंडपीठात याचिका दाखल करणार आहे़ माझ्या तक्रारीची उचित व योग्य ती कार्यवाही व्हावी़
- सोमेश क्षीरसागर,
शिवसेना कार्यकर्ता, मोहोळ