नाझरा मठाजवळ चोरटी वाळू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:25+5:302020-12-23T04:19:25+5:30
सांगोला : गस्त घालणाऱ्या सांगोल्याच्या पोलीस पथकाने चाेरट्या मार्गाने घेऊन निघालेली सव्वा ब्रास वाळू आणि वाहन पकडून गुन्हा ...
सांगोला : गस्त घालणाऱ्या सांगोल्याच्या पोलीस पथकाने चाेरट्या मार्गाने घेऊन निघालेली सव्वा ब्रास वाळू आणि वाहन पकडून गुन्हा दाखल केला. मात्र, कारवाईदरम्यान वाहनचालकाने अंधारात पळ काढला.
२१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास सांगोला-मिरज रस्त्यावर नाझरा मठाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक धुळदेव चोरमुले, हेडकॉन्स्टेबल बनसोडे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
मिरज महामार्गावर गस्त घालत असताना नाझरा मठाजवळ टेम्पोमधून बेकायदेशीर वाळू वाहतूक सुरू असल्याचे समजले. पोलिसांनी त्या टेम्पोचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून अंधारात पळ काढला. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता, हौद्यात सव्वा ब्रास वाळू आढळून आली. याप्रकरणी पोलीस नाईक धुळदेव चोरमुले यांनी टेम्पोचालकासह मालकाविरुद्ध फिर्याद दाखल दिली आहे.