वर्षभर विरोधी पक्षनेते म्हणून झेलले; आता दीड वर्षापूर्वीचे हकालपट्टीचे पत्र व्हायरल केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 01:33 PM2021-01-07T13:33:10+5:302021-01-07T13:33:16+5:30
सोलापुरातील शिवसैनिकांना समजेना, कोणती भूमिका घ्यावी ?
सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते म्हणून ज्या महेश कोठेंना शिवेसेनेने वर्षभर झेलले, आता दीड वर्षापुर्वी त्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचा साक्षात्कार शिवसैनिकांना होऊ लागला आहे. विधानसभा निवडणूकीत शिवेसेनेच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून कोठे यांची हकालपट्टी केल्याचे पत्र गुरूवार दि. ७ जानेवारी रोजी व्हायरल केले जाऊ लागले आहे. दरम्यान, महेश कोठे हे शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करीत आहेत.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे शिवसेना सोडून शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला या, असा निरोप शहर राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाठवला आहे. यावर शहरातील शिवसेना नेत्यांनी 'पहिल्यांदा जाऊ द्या, मग आम्ही काय बोलतो ते बघा' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
एमआयएमच्या सहा नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. आमदार संजय शिंदे, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या माध्यमातून या नगरसेवकांचा पक्ष प्रवेशावर अखेरची मोहोर उमटली आहे. महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेशाचे प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार शहराच्या राजकारणातील निर्णय घेताना आमदार संजय शिंदे, संतोष पवार यांना बोलावून घेत आले आहेत. कोठे यांच्या प्रवेशाबद्दल शहरातील नेते बुधवारी दुपारपर्यंत अनभिज्ञ होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह इतरांना निरोप पाठवण्यात आले. महेश कोठे यांनी २०१४ मध्ये काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांनी सेनेच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली. गेली अनेक दिवस ते शिवसेनेच असल्याचे सांगत होते. शुक्रवारी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांची उपस्थिती असेल.
विरोधी पक्षनेतेपदी अमोल शिंदे, विभागीय आयुक्तांना १९ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर महेश कोठे यांच्यासह शिवसेनेच्या १९ नगरसेवकांनी पालिकेत स्वतंत्र गट स्थापनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे दाखल केला होता. या प्रस्तावाच्या विरोधात शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी अर्ज दिला होता. महेश कोठे आणि मोहोळमधून बंडखोरी करणारे नगरसेवक मनोज शेजवाल यांचे सदस्यत्व रद्द करावे असे दोन स्वतंत्र अर्जही दिले होते. हे तीनही अर्ज चौगुले यांनी बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन मागे घेतले. महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड केल्याचे १९ नगरसेवकांच्या सह्यांचे पत्रही बुधवारी विभागीय आयुक्तांना देण्यात आले. हे पत्र दोन दिवसांत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मनपा प्रशासनाकडे येणार असल्याचा दावा चौगुले यांनी केला.
काय म्हणाले सेना नेते
शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी कोठे यांच्या भूमिकेवर बुधवारी प्रतिक्रिया दिली नाही. एकदा जाऊ द्या. मग काय बोलतो ते बघा, असे प्रताप चव्हाण म्हणाले.
एमआयएमच्या सहा नगरसेवकांसाठी स्वतंत्र कार्यक्रम होणार
एमआयएमच्या नगरसेवकांचाही प्रवेश ८ जानेवारी रोजी व्हावा असे काही नेत्यांकडून सुचविण्यात आले होते. परंतु, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह आमदार संजय शिंदे यांच्या उपस्थितीत स्वतंत्रपणे कार्यक्रम व्हावा असे एमआयएमच्या नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे हा कार्यक्रम स्वतंत्रपणे होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.
फोडाफोडीचे काय असतील पडसाद?
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. सहा महिन्यांपूर्वी पारनेर नगरपंचायतीच्या पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. याचे पडसाद मुंबईतही उमटले होते. त्यानंतर आघाडीतील फोडाफाडी थांबली होती. कोठेंच्या प्रवेशानंतर काय होणार याकडे लक्ष असेल.