मोठी बातमी; मिरजहून निघालेला विदेशी मद्याच्या टेम्पो सांगोल्याजवळ पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:53 PM2021-10-05T17:53:06+5:302021-10-05T17:53:37+5:30
२० हजार १६० सीलबंद बाटल्या असा ३५ लाख ७९ हजार ४५० मुद्देमालासह आयशर टेम्पो जप्त केला
सांगोला (अरुण लिगाडे) : माळशिरस व पंढरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय भरारी पथकाने संयुक्तपणे कारवाई करून मिरजकडून भरधाव निघालेला आयशर टेम्पो पकडून तपासणी केली. या कारवाईत गोवा राज्य निर्मित विक्रीस परवानगी असलेल्या विदेशी मद्याच्या २० हजार १६० सीलबंद बाटल्या असा ३५ लाख ७९ हजार ४५० मुद्देमालासह आयशर टेम्पो जप्त केला. ही कारवाई मंगळवार ५ रोजी सकाळी १० सुमारास सांगोला - मिरज रोडवरील शेतकरी सूतगिरणी जवळ कमलापूर हद्दीत केली.
याप्रकरणी टेम्पो चालक युवराज सुरेश बाबर (रा. पोखरापूर ता. मोहोळ) यास अटक केली आहे. त्यास सांगोला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवसाची कोठडी दिली आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी याच राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने आटपाडी -पंढरपूर रोड वरील कटफळ गावाच्या हद्दीत केलेल्या कारवाईत सुमारे २५ हजार मद्याच्या बाटल्यांसह आयशर टेम्पो असा सुमारे ५६ लाख २९ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून मोठी कारवाई केली होती.