सावधान; सॅनिटायझरच्या अति वापराने त्वचेवर होतोय परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 03:18 PM2020-09-14T15:18:38+5:302020-09-14T15:20:08+5:30
त्वचारोग तज्ज्ञांचे मत : शंभर नागरिकांमधून एकाला होतोय त्रास
सोलापूर : कोरोनाची भीती अद्याप संपलेली नाही. कोरोनामुळे अनेक जण दगावले... कोरोनाची लागण होईल ही एकच भीती. त्यापेक्षा उपचारासाठी मोठी रक्कम कशी उभी करायची ही चिंता अधिकच. कोरोना होऊ नये म्हणून बहुतांश जण सॅनिटायझरचा सातत्याने वापर करीत असताना त्याचा काही जणांच्या त्वचेवर परिणाम होत असतो, असे मत त्वचारोग तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले. शंभर जणांमधून एकाला हा त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ज्यांची त्वचा संवेदनशील (सेन्सेटिव्ह) आहे अशा लोकांच्या त्वचेला भेगा पडणे, त्वचा कोरडी पडणे, लाल होणे अथवा खाज सुटत असते. त्यामुळे सॅनिटायझरचा त्वचेवर परिणाम होत आहे. सॅनिटायझरने जीवाणू नष्ट करून अनेक आजारांपासून आपले रक्षण करतो. विषाणूंचा चांगल्या पद्धतीने नाश व्हावा म्हणून यामध्ये केमिकल आणि अल्कोहोलचा वापर केलेला असतो.
सध्या बाजारात जेल आणि पातळ सॅनिटायझर उपलब्ध आहे. त्यापैकी पातळ जास्त परिणामकारक असते. कारण ते हातांच्या सूक्ष्म भेगांपर्यंत पोहोचू शकते. जेलच्या स्वरुपातले मात्र त्वचेच्या खोलवर पोहोचू शकत नाही व वरच्या भागावरच थर बनून राहते. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्याही सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे कमीत-कमी प्रमाण ६० टक्के असावे तर जास्तीत-जास्त प्रमाण ६० ते ९० टक्के असावे असे स्पष्ट केले आहे. अधिकांश अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरमध्ये इथेनॉल, आयसोप्रोपील अल्कोहोल, एन-प्रोपेनोल वा यातील कोणत्याही दोन उत्पादनांचे कॉम्बिनेशन असते. त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून यात काही प्रमाणात ग्लिसरीन मिसळले जाते.
असे ओळखा बनावट सॅनिटायझर
बाजारात काही बनावट सॅनिटायझर आहेत, ती आपण ओळखू शकतो, पेपरवर पेनच्या मदतीने एक वर्तुळ काढा त्यावर काही सॅनिटायझरचे काही थेंब टाका शाई पसरली तर ते सॅनिटायझर बनावट असून वापरण्यास योग्य नाही. जर सॅनिटायझर योग्य असेल तर शाई पसरणार नाही आणि ओला पेपर सुद्धा कोरडा होईल.
ज्या लोकांची त्वचा सेन्सेटिव्ह आहे त्यांना त्वचेवर भेगा, कोरडेपणा, लाल होणे, खाज सुटणे अशी लक्षणे आढळून येत आहेत. जेव्हा साबण आणि पाण्याने आपले हात धुणे शक्य नसते तेव्हाच सॅनिटायझरचा वापर करावा हाच यावर उपाय आहे.
- डॉ. सचिन कोरे,त्वचारोग तज्ज्ञ.