सावधान...सर्दी, खोकला अन् तापाची औषधे आता चिठ्ठीशिवाय नाही मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 05:51 PM2022-01-07T17:51:38+5:302022-01-07T17:51:44+5:30
वातावरण बदलल्याचे परिणाम; मेडिकल दुकानात औषधांसाठी लोकांची गर्दी
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मेडिकल स्टोअर्समधून सर्दी, ताप, खोकला आणि घसादुखीच्या औषधांना मागणी वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार आणि वातावरण बदलल्याचे परिणाम यामुळे सध्या सर्दी, खोकला, घशात खवखव आणि तापाच्या रुग्णांमध्ये काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, तापाची लक्षणे जाणवताच लोकांनी काळजी म्हणून मेडिकलमधून औषधे घेण्यास सुरुवात केली आहे.
सतत राहणारी सर्दी, खोकला, जुलाब, ताप अशी सर्वसाधारण लक्षणे या आजाराची आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला झाल्यास कुठलीही हयगय न करता डॉक्टरांकडे जाण्याला लोक प्राधान्य देत आहेत. त्याचसोबत काळजी आणि स्वतःजवळ प्रथमोपचार असावा, या उद्देशाने सर्दी, खोकला यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधी जवळच्या मेडिकल स्टोअरमधून विकत घेण्यात येत आहेत. यामध्ये सिनारेस्ट, चेस्टनकोल्ड यासह पॅरासिटामॉल, कॉम्बिफ्लॅम यांचीदेखील विक्री जोरात सुरू आहे. प्रसंगी काही रुग्णांना डॉक्टर ॲझिथ्रोमायसिन हे ॲण्टिबायोटिक्स लिहून देत आहेत.
---
शासकीय रुग्णालयात ओपीडी वाढली
हवेतील प्रदूषण, फटाक्यांमुळे झालेले प्रदूषण, वातावरणात अचानक झालेला बदल, दिवसभर ऊन आणि रात्री थंडी अशा वातावरणातील बदलामुळे सर्दी - खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला होताच नागरिकांनी तत्काळ उपचार करावेत, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
----
...तर करा कोरोना टेस्ट
डोकेदुखी, खोकला, अंगदुखी, शिंका, घशाची खवखव, सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसली तरी त्याचा संबंध कोरोनाशी असेलच असे नाही. परंतु कोरोना टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. शहरातील संबंधित डॉक्टरांकडे एखाद्या कोरोना सदृश्य रूग्ण आढळून आल्यास संबंधित महापालिकेच्या यंत्रणेला कळविण्याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
----
बदललेले वातावरण
कोरोना नसला तरी पावसाळा व हिवाळा या दोन ऋतूंच्या बदलामध्ये वातावरणात मोठा बदल झाला असतो. हा बदल स्वीकारण्याइतकी प्रतिकारशक्ती मुलांमध्ये नसते. त्यामुळे या बदलाचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना होतो, असे शहरातील तज्ज्ञांनी सांगितले.
---
दहापैकी सात जण सर्दी खोकल्याचे
सध्या विषम हवामान आहे. दहा रुग्णांमध्ये सर्दी - खोकला असलेले रुग्ण आहेत. दहा रुग्णांमागे सात रुग्ण सर्दी - खोकला असलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे. लहान मुलांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांची व मोठ्यांचीही प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.
--
सध्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, घसा खवखव करणे, असे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या औषधांची काही प्रमाणात वाढ झालेली आहे.
-सिद्धेश्वर घाळे, औषेध विक्रेता, सोलापूर
दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असे विषम हवामान सध्या आहे. वातावरणात झालेला हा बदल सर्दी-खोकल्याला निमंत्रण देणारा ठरला आहे. त्यामुळे काही अंशी रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र ताप, सर्दी, खोकला याबाबतची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आम्ही देत नाही.
- यासीर शेख, औषध विक्रता, सोलापूर
----