सावधान; मोबाईलवरून फोटो पाठवला एक; पाहायला गेलो की दुसरीच मुलगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 05:46 PM2022-02-02T17:46:08+5:302022-02-02T17:46:20+5:30
ऑनलाईन जोडीदार शोधताय, सावधान..! : फोटोसाठी मोबाईलवरील फिल्टरचा वापर
सोलापूर : ऑनलाईन वेबसाईट किंवा सोशल मीडियामधून विवाह जुळवताना अनेकजण आढळतात. अनेकदा ऑनलाईन पद्धतीने एक फोटो दाखविला जातो. फोटो पाहून पसंती दिली, तर प्रत्यक्षात दुसरीच मुलगी दाखविली जाते. मुले पाहतानादेखील अनेकांना असा अनुभव येतो. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते. आपली अशी फसवणूक होऊ नये म्हणून ऑनलाईन जोडीदार निवडताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
ही घ्या काळजी...
- - लग्न करायचा विचार पक्का झाला असेल, तरच आपली माहिती लग्नविषयक साईटवर नोंदवा.
- - एकदा तरी मुलाच्या किंवा मुलीच्या संपूर्ण तपशीलाची पडताळणी इंटरनेटवर करा.
- - शक्य असल्यास मुलाची किंवा मुलीची फेसबुक अकाउंटवर माहिती मिळवा.
- - स्मार्ट फोनवर मुलाचे किंवा मुलीचे फोन नंबर ट्रू कॉलर ॲपवर तपासा म्हणजे त्यांचे नाव बरोबर आहे का, इतके तरी किमान तपासून घेता येईल.
विवाह संकेतस्थळावर असलेल्या माहितीवर पूर्णत: विश्वास ठेवू नका. मुलगा किंवा मुलीच्या शिक्षणाबद्दल, नोकरीविषयी, ठिकाणाविषयी, प्रत्यक्ष त्याच्या किंवा तिच्या ऑफिसमध्ये जाऊन तेथील लोकांना भेटून चौकशी करून घ्या. आपल्या जवळच्या माणसांकडून माहिती घेऊन त्यांनी दिलेली माहिती बरोबर आहे का, याची खात्री करून घ्यावी. फसवणुकीपासून सावध राहा.
- सूरज निंबाळकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, सोलापूर ग्रामीण
-----
आधी फोटो व बायोडेटा पाहूनच प्रत्यक्ष मुलगी पाहायला जाणे हे केव्हाही चांगले. पण, आधी फोटो जुना दाखवणे, प्रत्यक्षात दिसण्यात फरक असणे, असे अनुभव आले आहेत. त्यामुळे मी ओळखीच्या व्यक्तीने सांगितल्यावरच मुलगी पाहायला जातो.
- विवाहेच्छुक वर
ऑनलाईन पद्धतीने स्थळ पाहताना फसवणुकीची शक्यता टाळता येत नाही. मुलाचे वय, तो नक्की कुठे काम करतो, हे पडताळूनच पाहावे लागते. अनेकदा तर असलेल्या पगारापेक्षा अधिक पगार वाढवून सांगितला जातो. त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने वधू-वर सूचक मंडळाकडे जाण्याचा पर्याय अधिक चांगला आहे.
- विवाहेच्छुक वधू
सध्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून फोटो काढून त्यात फिल्टर वापरून बदल केले जातात. ऑनलाईन पद्धतीने स्थळ पाहताना फक्त मुलीकडीलच नव्हे, तर मुलाकडचेही दुसराच फोटो दाखवतात. आम्ही घेतलेल्या एका मेळाव्यात अनेक पालकांनी अशा तक्रारी केल्या. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करत असताना प्रत्यक्षात त्या वेबसाईटचे कार्यालयही पाहायला हवे.
- आर्या इंगळे, संचालक, वधू-वर सूचक मंडळ
------