सावधान; ‘इम्युनिटी बुस्टर’ औषधांचे साईड इफेक्टस् ठरताहेत त्रासदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:54 PM2020-09-14T12:54:09+5:302020-09-14T12:55:53+5:30
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने अनेक औषधे बाजारात दाखल
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : कोरोना आजारापासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती महत्त्वाची भूमिका बजावते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अॅलोपॅथी, आयुर्वेदाची अनेक औषधे बाजारात नव्याने आली असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेतल्याने शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पुरळ येणे, बेंड येणे तसेच अन्य त्रासदायक साईड इफेक्टला सामोरे जावे लागेल, असा इशारात तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
विविध माध्यमांमधून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाºया जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या जाहिरातीमध्ये प्रत्यक्ष कोरोनापासून बचाव करण्याचा दावा केला जातो. कोरोना आजार पसरत असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढायला हवी या विचाराने लोक औषधे घेतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे धोक्याचे ठरु शकते. खास कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती विशेष अशी औषधे असल्याचे संशोधन अद्याप तरी झालेले नाही.
आयुर्वेद तसेच अॅलोपॅथीमध्ये व्हिटॅमीन सी, झिंक यासारखी औषधे असतात. ही औषधे कधी घ्यावीत व किती प्रमाणात घ्यावीत हे तपासणीनंतरच कळू शकते. प्रत्येकाची उंची, वजन, वय यानुसार औषधांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्री देखील वेगवेगळी असते. त्यामुळे एकच औषध तितक्याच प्रमाणात सर्वच व्यक्तींना लागू पडते असे नाही. यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करुनच औषधे घ्यायला हवीत.
औषधं घ्यायची की नाही हे डॉक्टरांना ठरवू द्या
कामामुळे बाहेर पडावे लागते. बाहेर जास्त वेळ थांबून काम करावे लागते. जास्त लोकांशी संपर्क येतो, म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधांची जास्त गरज आहे, असे समजून अनेक लोक अशी औषधे घेतात. यामुळे उष्णता वाढणे, पुरळ येणे, बेंड होणे असे साईड इफेक्ट दिसायला लागू शकतात. आपल्याला कोणते औषध जास्त परिणामकारक व साईड इफेक्ट न करणारे आहेत हे पहावे लागते. त्यामुळे कोणते औषध घ्यायचे ते डॉक्टरांना ठरवू द्यायला हवे.
रोगप्रतिकारक शक्ती मोजण्याचे कोणतेही एकक सध्यातरी नाही. एखादे औषध घेण्याआधी तपासणी करणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषध विक्रीच्या दुकानातून औषधे घेणे टाळायला हवे. तसेच एखाद्याला दिलेले औषध दुसºयाला देणे अपायकारक ठरु शकते.
- डॉ. अभिजित जगताप
सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ