सतर्क शेतकऱ्यांना मिळाली विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:40+5:302021-02-07T04:20:40+5:30
यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ झाली. मात्र जोमात आलेली खरीप पिके ...
यावर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्रातही मोठी वाढ झाली. मात्र जोमात आलेली खरीप पिके सतत पाऊस पडत राहिल्याने नुकसानीत सापडली. त्यातच अतिवृष्टी झाल्याने पिके वाहून गेली. चांगला पाऊस पडल्याने यावर्षी दोन लाख ७० हजार ३९४ शेतकऱ्यांनी एक लाख ८९ हजार ८१५ हेक्टर क्षेत्रासाठी पीकविम्याची रक्कम भरली होती. शेतकरी हिस्सा १० कोटी ३५ लाख तसेच शासन हिस्स्यासह विमा कंपनीकडे १२० कोटी १५ लाख रुपये जमा झाले होते.
अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले असेल तर शासन व विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर, मेलद्वारे व लेखी अर्ज देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले होते. त्यावेळी ५५ हजार ८५१ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ४१ हजार ४२ शेतकऱ्यांना ३४ कोटी ७७ लाख रुपये विमा कंपनीने दिले आहेत. पात्र असलेल्या ६ हजार ४८९ शेतकऱ्यांना ४ कोटी ३३ लाख रुपये मंजूर आहेत, मात्र शासन हिस्सा जमा न झाल्याने शेतकऱ्यांना पैशाची वाट पहावी लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे सजगपणे ( सर्तक) तक्रार नोंदविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने पैसे दिले मात्र विमा भरूनही अतिवृष्टीनंतर तक्रार नोंदविण्यासाठी गाफील राहिलेल्या सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर मदत अवलंबून आहे.
-----
२३८४ पीक कापणी प्रयोग
खरीप हंगामातील सर्वच पिकांचे २३८४ पीक कापणी प्रयोग करण्यात येत आहेत. त्यापैकी १९१६ प्रयोगाचे अहवाल शासन व विमा कंपनीकडे गेले आहेत तर ४६८ अहवाल अद्याप गेलेले नाहीत. हे अहवाल गेल्यानंतर व अहवालात नुकसान किती दाखविले यावर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अवलंबून आहे, तूर व भुईमुगाचे पीक कापणी अहवाल पेंडिंग असल्याचे सांगण्यात आले.
---
दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा आमच्या तालुक्यातील शेतकरी भरतात. मात्र विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जाते. यावर्षी सर्वच पिके मातीसह वाहून गेली, मात्र सरकार व विमा कंपनीने अद्याप कसलीही आर्थिक मदत दिली नाही.
- बाळासाहेब पाटील,
माजी पंचायत समिती सदस्य
----