‘सीबीएसई’ शिक्षण पद्धतीची दुकानदारी मोडीत काढणार : विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 04:48 PM2019-02-09T16:48:36+5:302019-02-09T16:50:15+5:30

सोलापूर : सध्याच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवित कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्राधान्य देण्यात ...

'CBSE' will disrupt the learning process: Vinod Tawde | ‘सीबीएसई’ शिक्षण पद्धतीची दुकानदारी मोडीत काढणार : विनोद तावडे

‘सीबीएसई’ शिक्षण पद्धतीची दुकानदारी मोडीत काढणार : विनोद तावडे

googlenewsNext
ठळक मुद्देसध्याच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवित कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्राधान्य देण्यात येणार - विनोद तावडेराज्यात शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. दहावी अनुत्तीर्णांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅक्टोबरऐवजी जुलैमध्येच फेरपरीक्षा सुरु - विनोद तावडे

सोलापूर : सध्याच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवित कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्राधान्य देण्यात येणार आहे. अशी प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून सुरू झाली आहे. याद्वारे सध्या असलेली सीबीएसई शिक्षण पद्धतीची दुकानदारी मोडीत काढू असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व  उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. 
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेच्या अमृतमहोत्सव समारोप सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रारंभी गणेश व मार्कंडेय महामुनींच्या मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, सचिव दशरथ गोप, माजी खासदार गंगाधरपंत कुचन,गणेश बुधारम, धर्मण्णा सादूल, आ. प्रणिती शिंदे, माजी आ. नरसय्या आडम, मुरलीधर आरकाल, दीपक मुनोत, विनायक रार्चला, जगदीश दिड्डी, गोविंद गज्जम, डॉ. मीरा शेंडगे, प्राचार्या गीता  सादूल,शारदा गोरट्याल, प्रा.अनिल निंबाळकर व विश्वस्त व्यंकटेश आकेन, विजयकुमार गुल्लापल्ली, श्रीनिवास कटकूर, अ‍ॅड.श्रीनिवास क्यातम, श्रीधर चिट्याल, दिनेश यन्नम, लक्ष्मीकांत गड्डम, हरीश कोंडा, संगीता इंदापुरे, सुलोचना गुंडू, लक्ष्मीनारायण कमटम, अरविंद कुचन,नरसय्या इप्पाकायल, हरिदास पोटाबत्ती,नागनाथ गंजी आदी उपस्थित होते.

 पुढे बोलताना तावडे म्हणाले की, राज्यात शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. दहावी अनुत्तीर्णांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून आॅक्टोबरऐवजी जुलैमध्येच फेरपरीक्षा सुरु केली. गुणपत्रिकेतून नापास ही संज्ञाच हद्दपार करुन उत्तीर्ण किंवा कौशल्य विकासास पात्र ही नवी पद्धत सुरु केली. विद्यार्थ्यांना  जे जमते तेच शिक्षण पाहिजे यादृष्टीने कौशल्य विकासावर आधारित शिक्षणपद्धती राबविल्यास या माध्यमातून भरीव अर्थार्जनाच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. गेल्या ७५ वर्षांपासून विडी व यंत्रमाग कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य संस्था करीत आहे, या प्रशालेचे विद्यार्थी जगभर आहेत. याचा अभिमान वाटतो. असे  सांगून तावडे यांनी संस्थेचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

याप्रसंगी पालकमंत्री देशमुख यांनी या संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे सांगितले.  तरी या संस्थेला आवश्यक निधी सरकार देईल, असा आशावाद व्यक्त केला. माजी खा. कुचन यांनी कुचन प्रशालेचा इतिहास मांडला. आ. शिंदे म्हणाल्या, शिष्यवृत्ती तसेच शिक्षणासाठी १९६७ च्या पुराव्याची अट हा जटिल प्रश्न असून तो  शिक्षणमंत्र्यांनी सोडवावा.  माजी आ. आडम यांनी पुल्ली कन्या प्रशालेचे वर्ग विनाअनुदानित असल्याचा मुद्दा मांडला. प्रास्ताविक सचिव दशरथ गोप यांनी केले. सूत्रसंचालन उमा कोटा,अभिज भानप यांनी केले.आभार गोपाळ मुडदिड्डी यांनी मानले.

माजी विद्यार्थ्यांनी जागविल्या आठवणी...
- कुचन प्रशालेचे माजी विद्यार्थी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमृतमहोत्सवाच्या सांगता समारंभाचे आयोजन केल्यामुळे शाळा परिसर अत्यंत आकर्षक पध्दतीने सजविण्यात आला होता. शाळेचे माजी विद्यार्थी उद्योग - व्यवसायाबरोबरच प्रशासन आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. हे विद्यार्थी या देखण्या समारंभाचा साक्षीदार होण्यासाठी आवर्जुन आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलच्या आठवणी जागविल्या. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षकांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शाळेत रूजू होण्यापासूनच्या आठवणी सांगितल्या. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या पदाधिकाºयांनी या समारंभाचे नेटके नियोजन केल्याबद्दल उपस्थितांनी प्रत्यक्ष भेटून त्यांची प्रशंसा केली.

Web Title: 'CBSE' will disrupt the learning process: Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.