सोलापुरातील कोरोना हॉटस्पॉटवर आता सीसीटीव्हीची कॅमेºयाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 11:46 AM2020-05-18T11:46:35+5:302020-05-18T11:52:04+5:30
नगरविकास मंत्र्यांचे सोलापूरवर आहे लक्ष; शहरातील १३ हॉटस्पॉट पोलीसांनी केले सील
सोलापूर : शहरातील शास्त्रीनगर, भारतरत्न इंदिरानगर यासह १३ परिसर कोरोना हॉटस्पॉट ठरले आहेत. या परिसरातील हालचालींवर आता महापालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर असणार आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
शहराच्या निम्म्यापेक्षा जास्त परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील १३ परिसर हे कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात. या परिसरातील नागरिकांनी अत्यावश्यक कामाखेरीज बाहेर पडू नये, असे आदेश प्रशासनाकडून दिले जातात. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या परिसरातील हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेºयांच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी शास्त्रीनगर, भारतरत्न इंदिरानगर या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू होते. उर्वरित भागात आगामी चार ते पाच दिवसांत कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
लेडी डफरीन हॉस्पिटलमध्ये एक नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे. या कक्षातून १३ परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या भागात आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. अत्यावश्यक सुविधा पुरविल्या जात आहेत. यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.
नगरविकास मंत्र्यांनी मनपाला पाठविले सॅनिटायझर
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर महापालिकेला ४०० लिटर सोडियम हायपोक्लोराईड, २०० लिटर सॅनिटायझर पाठविले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी आयुक्त दीपक तावरे आणि उपायुक्त अजयसिंह पवार यांना हे साहित्य सुपूर्द केले.