मनपात मुंडेंच्या आठवणींना उजाळा
By admin | Published: June 18, 2014 01:06 AM2014-06-18T01:06:12+5:302014-06-18T01:06:12+5:30
शोकप्रस्तावानंतर सभा तहकूब: मुंडे यांचे स्मारक करण्याची नरोटे यांची मागणी
सोलापूर: भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना महापालिका सभागृहात उजाळा देण्यात आला़ भाजप-सेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी आणि बसपाच्या नगरसेवकांनी मुंडेंबद्दल भावना व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली़
महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा मंगळवारी आयोजित केली होती़ सभेच्या सुरुवातीला महापौर अलका राठोड यांनी दुखवट्याचा प्रस्ताव मांडला़ एक कुशल संघटक हरपला, त्यांच्यामुळे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली असल्याची भावना महापौर अलका राठोड यांनी व्यक्त केली़ त्यानंतर सभागृहात अनेक नगरसेवकांनी मुंडे यांच्या आठवणींनाा उजाळा दिला़ मुंडेसाहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते़ त्यांना नुकतेच ग्रामविकास खाते मिळाले होते, ते हयात असते तर निश्चित त्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा बदलला असता, असे मत मोहिनी पतकी यांनी व्यक्त केले़ माझ्या आणि वल्याळ कुटुंबीयांच्या जडणघडणीमध्ये फक्त मुंडे साहेबांचाच वाटा असल्याचे नागेश वल्याळ म्हणाले़ अभिनंदनाचा ठराव मांडण्याऐवजी शोकप्रस्ताव मांडण्याचे दुर्दैव आले, मुंडे साहेबांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे अशोक निंबर्गी म्हणाले़
यावेळी बसपाचे आनंद चंदनशिवे, इंदिरा कुडक्याल, अनिल पल्ली, सुशीला आबुटे, शोभा बनशेट्टी, दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे, चंद्रकांत रमणशेट्टी, भीमाशंकर म्हेत्रे, जगदीश पाटील आदींची भाषणे झाली़
-----------------------
पंकजा मुंडेंना बिनविरोध खासदार करा- कोठे
गोपीनाथ मुंडे हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते़ बहुजन समाजातील नेता म्हणून त्यांनी कौतुकास्पद काम केले़ त्यांचे काम प्रेरणादायी असून शहरात त्यांचे स्मारक उभारावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी केली तर मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना बिनविरोध खासदार म्हणून निवडून द्यावे आणि त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी भावना देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली़