सोलापुरातील नागेश करजगी आॅर्किड शाळेत रंगतो लोकशाहीचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:34 PM2019-08-01T14:34:44+5:302019-08-01T14:38:36+5:30
माझी प्रयोगशील शाळा...शिक्षणाचा सोलापुरी पॅटर्न: नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी शाळेचा उपक्रम
सोलापूर : उमेदवारी जाहीर केल्यानंतर आचारसंहितेचे पालन करुन प्रत्यक्ष प्रचार, मतदारांना मत देण्याचे आवाहन, मतदानाच्या दिवशी मतदारयाद्या पाहून मतदान केंद्रात प्रवेश देणे, मतदारांच्या बोटाला शाई लावून मतदान करणे अशा सर्व बाबी ज्या प्रत्यक्ष निवडणुकीत होतात त्यांचे तंतोतंत पालन नागेश करजगी आॅर्किड स्कूलमध्ये करण्यात येते. याद्वारेच हेड बॉय व गर्ल यांची निवड करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा प्रयोगशील उपक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांमध्ये ग्रीन, व्हाईट, आॅरेंज, ब्लू असे चार विभाग करण्यात येतात. प्रत्येक विभागासाठी एक कॅप्टन निवडला जातो. या कॅप्टनमधून एक हेड बॉय व एक हेड गर्ल निवडण्यात येते. अशा प्रकारे लोकशाहीचा उत्सवच शाळेमध्ये साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्राची लोकपरंपरा जपण्याचा प्रयत्न आषाढी दिंडीच्या माध्यमातून केला जातो. बालवैष्णवांचा मेळा शाळेत जमतो. वारकºयांच्या वेशात विद्यार्थी विठ्ठलनामाचा गजर करतात़ यासोबतच शाळेत आरोग्य शिबीरही घेतले जाते. अनेक साथीच्या आजारांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते़ आजारामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानीचाही सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता शाळेत भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. यात शारीरिक स्वच्छतेविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
ग्रामीण व शहरी भागात स्वच्छतेअभावी लोक आजारी पडतात. अनेक आजारांना निमंत्रण मिळते. काहीवेळा तर मृत्यूलाही सामोरे जाण्याच्या घटना घडतात. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, याबाबत ते जागरुक असावेत यासाठी शाळेमध्ये स्वच्छ भारत अभियानाचा जागर करण्यात येतो. विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यविषयक शपथ देण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला वाव देण्याच्या उद्देशाने वादविवाद स्पर्धचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी स्वच्छ भारत या संकल्पनेवर आधारित वादविवाद स्पर्धेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येते. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष कुमार करजगी, संस्थेच्या सचिव वर्षा विभूते, संचालिका नंदिनी करजगी, प्रशासनाधिकारी राजाराम चव्हाण, प्राचार्या अन्नपूर्णा अनगोंडा, डॉ. पी. टी. सावंत, देवेंद्र निंबर्गीकर, श्रीकांत जोशी यांचे मार्गदर्शन लाभते.
पेपर बॅग मेकिंग वर्कशॉपसोबत इतरही उपक्रम
- विद्यार्थ्यांसाठी पेपर बॅग मेकिंग वर्कशॉप घेण्यात येते. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते व पर्यावरणाची काळजी घेण्याचा कानमंत्र या माध्यमातून दिला जातो. विद्यार्थ्यांना ऋतूंची ओळख व्हावी, आपल्या वर्गमित्रांसोबत चिमुकल्यांना शाळेत पाऊस अंगावर झेलता यावा, या उद्देशाने ‘रेन डे’चे आयोजन करण्यात येते. गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरूने दाखविलेल्या वाटेवर प्रत्येक जण आपली वाटचाल करतो. त्यांच्यामुळेच विद्यार्थी घडतो. याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी गुरूपौर्णिमेचा उत्सव शाळेमध्ये घेण्यात येतो.
लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कळणे गरजेचे आहे. यामुळे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता येते. विद्यार्थी स्वयंप्रेरणेने कार्य करण्यास तयार व्हावा, या उद्देशाने आॅर्किड शाळेमध्ये संसदीय निवडणुकीचे आयोजन केले जाते. या उपक्रमास विद्यार्थ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.
- रूपाली हजारे
मुख्याध्यापिका, नागेश करजगी आॅर्किड स्कूल.