टेंभुर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-कुसळंब-कळंब रस्त्याला केंद्राकडून १५७ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:20 AM2021-05-15T04:20:16+5:302021-05-15T04:20:16+5:30
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथून सुरू होणाऱ्या अंबाड, कुर्डूवाडी, बार्शी बायपास ते कुसळंब या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक ...
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथून सुरू होणाऱ्या अंबाड, कुर्डूवाडी, बार्शी बायपास ते कुसळंब या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने १५७ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी २०२०-२१ या वर्षांमध्ये मंजूर केला आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण याद्वारे होणार आहे. यामुळे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश आले आहे.
टेंभुर्णी ते कुर्डूवाडी, बार्शी बायपास मार्गे कुसळंब असा ७३ किलोमीटर लांबीचा रस्ता यामध्ये होणार आहे. हा महामार्ग माढा, करमाळा, बार्शी विधानसभा मतदारसंघातून जात असून, या महामार्गामुळे मुंबई, पुणे, सातारा, सांगली व पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांसाठी, मराठवाड्यात येण्या-जाण्यास जवळचा व महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण केले जाणार असून, ह्या कामासाठी भरीव निधी मंजूर झाल्यामुळे या भागातील जनतेची व लोकप्रतिनिधींची अनेक दिवसांची मागणी पूर्णत्वास येणार असून, लोकांची गैरसोय दूर होणार आहे.
...........
कोट-
माढा तालुक्यातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल शुगर यासह इतर साखर कारखान्यांची हजारो वाहने, बैलगाडी यांची वाहतूक चार महिने मोठ्या प्रमाणावर चालू असल्याने रहदारी असते. त्यामुळे तासन् तास वाहतुकीचा खोळंबा होतो. यामुळें टेंभुर्णी ते पिंपळनेर व कुर्डुवाडी ते म्हैसगाव यादरम्यान सर्व्हिस रस्ता करणेसाठीदेखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे. या ठिकाणी सर्व्हिस रस्ता करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न राहणार आहे.
- आ. बबनदादा शिंदे,
............