केंद्राच्या निधीसाठी बैठक
By Admin | Published: June 7, 2014 01:04 AM2014-06-07T01:04:06+5:302014-06-07T01:04:06+5:30
विकास आराखडा सादर : गुडेवार-बनसोडे यांच्यात चर्चा
सोलापूर : सोलापूर शहराच्या विकासासाठी केंद्र सरकारचा निधी आणि योजना आणणे आणि त्यासाठी पाठपुराव्यात सातत्य ठेवणे आणि त्या मंजूर करून घेण्याबाबत महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नवी दिल्ली येथे खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे शहराचा विकास आराखडा सुपूर्द केला.
आयुक्त गुडेवार यांनी प्रारंभी संसदेच्या प्रांगणातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या साक्षीने अॅड. बनसोडे यांना शहर विकास आराखडा सादर केला. त्यानंतर दोघांची बैठक झाली. मुंबई, पुणे, नाशिकनंतर उद्योगाच्या विकासासाठी सोलापूरकडे पाहिले जाते. त्यादृष्टीने उद्योगवाढीला प्राधान्य देण्यासंदर्भात दोघांनी चर्चा केली.
आगामी पन्नास वर्षांचा विचार करून या शहरातील वाढणारी लोकसंख्या आणि त्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत. रस्ते, पाणी, आरोग्य या सुविधांसाठी किती निधी लागू शकतो, याबाबतचा सविस्तर आराखडा गुडेवार यांनी तयार केला आहे. सोलापुरात विजयी झाल्यानंतर अॅड. बनसोडे यांनी शहरातील उद्योजक, जिल्हाधिकारी, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्या भेटी घेऊन शहर विकासासाठीच्या योजना जाणून घेतल्या होत्या. सोलापूरच्या केंद्र शासनस्तरावर कोणत्या अडचणी आहेत, त्यांची सोडवणूक कशा पद्धतीने करता येईल, याबाबतही चर्चा केली होती.
------------------------------------------
सोलापूरच्या विकासासंदर्भात आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याशी उत्तम चर्चा झाली. शहराच्या प्रश्नासंबंधी केंद्र सरकारच्या ज्या ज्या विभागात जाऊन पाठपुरावा करावा लागणार आहे, तेथे जाऊन प्रश्न लावून धरणार आहे, योजना मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात कोणतीही कसूर करणार नाही.
- अॅड. शरद बनसोडे
खासदार, सोलापूर
-----------------------------------------------
खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा झाली. पाणीपुरवठा आणि ड्रेनेजसाठी अनुक्रमे १४४० कोटी व ३२५ कोटी रूपयांची गरज आहे. केंद्राच्या योजनेतून हा निधी मिळावा, अशी मागणी केली. सोलापूरच्या प्रश्नांबाबत अॅड. बनसोडे अन्य लोकप्रतिनिधींप्रमाणे सकारात्मक आहेत.
- चंद्रकांत गुडेवार
आयुक्त, सो. म. पा.