विडी बंडलच्या होलसेल पॅकिंगवरील ‘हेल्थ वॉर्निंग’ला केंद्राची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 02:15 PM2020-08-11T14:15:53+5:302020-08-11T14:31:44+5:30
केंद्राचे एक पाऊल मागे; अन्यथा तीन लाख कामगार जाणार होते संपावर
सोलापूर : विडी बंडलच्या रिटेल पॅकिंगवर हेल्थ वॉर्निंगचे सहचित्र मजकुरासह वापरणे बंधनकारक आहे. विडी बंडलच्या ८५ टक्के पृष्ठभागावर सदर चित्र लावणे बंधनकारक आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने १ सप्टेंबरपासून विडीच्या होलसेल पॅकिंगवर देखील हेल्थ वॉर्निंगचे चित्र लावणे बंधनकारक केले होते. या निर्णयास विडी कारखानदारांनी विरोध केला. त्यानंतर एक पाऊल मागे घेत केंद्र सरकारने हेल्थ वॉर्निंगच्या चित्राला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्रातील जवळपास दोनशे कारखानदार केंद्रांच्या या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच कामगार मंत्रालयाने विडीच्या होलसेल पॅकिंगवर हेल्थ वॉर्निंगचे धोकादायक सचित्र लावण्याचे आदेश काढले. त्याची अंमलबजावणी एक सप्टेंबर २०२० पासून करण्याची सूचनाही केली होती. शासनाच्या या निर्देशामुळे कारखानदार भयभीत झाले. सध्या विड्यांच्या रिटेल बंडलच्या ८५ टक्के पृष्ठभागावर धोकादायक सचित्र लावले जात आहे.
आता पुन्हा होलसेल पॅकिंगवर सचित्र लावणे अनावश्यक असल्याची बाजू कारखानदारांनी मांडली. त्याकरिता कामगार मंत्रालय तसेच आरोग्य मंत्रालयाकडे पाठपुरावाही केला. सध्या कारखानदार अडचणीत आहेत. मागील चार महिन्यात एक विडी देखील विक्री झाली नाही. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे याची अंमलबजावणी आमच्याकडून अशक्य आहे. होलसेल पॅकिंगची सक्ती झाल्यास भविष्यात कारखानदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा दिला. त्यानंतर शासनाला एक पाऊल मागे यावे लागले.
रिटेल पॅकिंगवर शासनाच्या नियमानुसार हेल्थ वॉर्निंगचा सचित्र मजकूर छापला जात आहे. त्यामुळे होलसेलवर काही गरज नाही. होलसेल पॅकिंगवर धोकादायक चित्र लावणे अनावश्यक आहे. त्यामुळे आमच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. हे चुकीचे आहे. आम्हाला मान्य नाही. शासनाने दिलेली स्थगिती दिली हे उत्तमच झाले.
- सुधीर साबळे, अध्यक्ष -महाराष्ट्र विडी कारखानदार संघ