राज्यातील तूर खरेदी मुदतवाढीस केंद्राची अनुकूलता, सहकारमंत्र्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:10 PM2018-05-25T13:10:33+5:302018-05-25T13:10:33+5:30
पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांची भेट घेऊन चर्चा केली़
सोलापूर : शेतकºयांची तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. केंद्र सरकार याबाबत अनुकूल आहे. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षित असून, शेतकºयांनी तूर खरेदीबाबत आश्वस्त राहावे, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज नवी दिल्ली येथून केले आहे.
तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी देशमुख यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना राज्यातील तूर खरेदीच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. केंद्रीय कृषिमंत्र्यांशी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन अनुकूल आहे. या बैठकीला केंद्रीय सचिव पटनायक, ‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक चढ्ढा व इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यात यावर्षी १ फेब्रुवारीपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली. खरेदीचा विहित कालावधी संपल्यानंतर १५ मेपर्यंत केंद्र शासनाने मुदतवाढ दिली होती; पण आणखी तूर शिल्लक असल्यामुळे केंद्र शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू होता. यावर्षी १५ मेपर्यंत १९३ खरेदी केंद्रांवर ३३ लाख १५ हजार १३२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे.
शेतकºयांची तूर खरेदी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, केंद्र शासनाने मुदतवाढ देण्यास अनुकूलता दर्शवली आहे. लवकरच मुदतवाढीचे आदेश काढण्यात येतील. तरी शेतकरी बांधवांनी आपल्याकडील तूर कमी भावाने खासगी व्यापाºयांना विकू नये, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.