केंद्रीय पथकाचा दौरा; फुलाबाईंच्या शेतातील चिखल दोन महिन्यांनंतरही तसाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 01:20 PM2020-12-23T13:20:48+5:302020-12-23T13:22:58+5:30

पथकातील अधिकारी आवक, मातीच्या नुकसानीसाठी कृषी विद्यापीठाची मदत घेण्याची सूचना

Central Squad Tour; The mud in Phulabai's field remained the same even after two months | केंद्रीय पथकाचा दौरा; फुलाबाईंच्या शेतातील चिखल दोन महिन्यांनंतरही तसाच

केंद्रीय पथकाचा दौरा; फुलाबाईंच्या शेतातील चिखल दोन महिन्यांनंतरही तसाच

Next
ठळक मुद्देअति पावसाने व पुरामुळे नदीकाठची शेती धोक्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनाला आलेपेनूर येथे फुलाबाई माने, विजया चव्हाण यांच्याशी पथकाने संवाद साधलाशेती, विजेचे जमीनदोस्त झालेले खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी

सोलापूर : आमच्याकडे लई पावूस झाला, बघा रानात अजून चिखल हाय, असे गार्हाणे मांडत फुलाबाई यांनी बोट करून शिवाराची स्थिती निदर्शनात आणताच केंद्रीय पथकातील अधिकारीही आवक झाले. दोन महिन्यांनंतरही शेतात चिखल पाहून झालेल्या अतिवृष्टीची कल्पना येते, असे मत पथकाने यावेळी मांडले.

ॲाक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या पथकात केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे उप सचिव यश पाल व रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांचा समावेश आहे. या पथकाने मोहोळ तालुक्यातील लांबोटी, कोळेगाव व पेनूर येथील नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 लांबोटी येथे तात्या चंदनशिवे यांच्या ऊसाची व कोळेगाव येथील देशमुखवस्ती येथील पाण्याने भरलेला बंधारा , परिसरातील शेती, विजेचे जमीनदोस्त झालेले खांब, पडझड झालेल्या घरांची पाहणी करून पथकाने माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे भोगावती, सीना आणि नागझिरा नद्यांचे पाणी रात्री अचानक वाढले. यामुळे घर वाहून गेल्याचे कुंडलिक देशमुख, निखिल देशमुख यांनी सांगितले.

 पेनूर येथे फुलाबाई माने, विजया चव्हाण यांच्याशी पथकाने संवाद साधला. फुलाबाईने असा पाऊस या जन्मात पाहिला नाही, असा अनुभव कथन केला. विजया यांनी मका पिकाचे नुकसान दाखविले. पंचनामा झाला आहे, पण अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याची कैफियत मांडली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी मदत मिळणार असल्याचे सांगितले. भारत सलगर यांनी पावसाने दीड एकर केळीच्या बागेचे नुकसान झाल्याचे निदर्शनाला आणले. दोन्ही अधिकार्यांनी बागेत जाऊन नुकसानीचा अंदाज घेतला. कृषी अधिकारी माने यांनी केळीची वाढ व घडभरणीबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी करमाळा तालुक्यात केळीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे निर्यातक्षम केळीच्या बागेत काम करणारे पश्चिम बंगालचे मजूर निघून गेल्याने समस्या निर्माण झाली, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे निदर्शनाला आणले.

वाहून गेलेल्या मातीचे परीक्षण

अति पावसाने व पुरामुळे नदीकाठची शेती धोक्यात आल्याचे पथकाच्या निदर्शनाला आले. व्यास यांनी वाहून गेलेल्या मातीचे परीक्षण करून अशी शेती सुधारण्यासाठी आता कृषी विद्यापीठाची मदत घ्या, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

 

रस्ते नुकसानीची घेतली माहिती

दौऱ्यावर निघण्यापूर्वी पथकाने विश्रामधाम येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता शेलार यांनी रस्ते तर पडळकर यांनी वीज कंपनीच्या नुकसानीची माहिती दिली. कृषी अधिकारी माने यांनी जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची सविस्तर आकडेवारी सादर केली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रकल्प संचालक संजय कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, पशुसंवर्धन उपायुक्त सोनवणे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास कोरे, दत्तात्रय गावडे, संभाजी धोत्रे, सुनील कटकधोंड उपस्थित होते.

Web Title: Central Squad Tour; The mud in Phulabai's field remained the same even after two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.