दोन महिन्यांनंतर केंद्राचे पथक; ग्रामीण भागात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:22 AM2020-12-22T04:22:11+5:302020-12-22T04:22:11+5:30
सांगोला : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर केंद्रांच्या पथकाला जाग आली ...
सांगोला : सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यानंतर केंद्रांच्या पथकाला जाग आली आहे. सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक आज मंगळवारी सांगोल्यात येणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे केंद्राचे पथक नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याऐवजी हायवेवर असणाऱ्या गावांची पाहणी दौरा करणार असल्याने नुकसान झालेल्या गावातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सांगोला तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसाने धुडगूस घातला होता. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके डोळ्यासमोर वाहून गेली. अशात बळीराजाला मदत तर सोडाच; पण साधी नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारला वेळ मिळाला नव्हता. जवळपास ४० हजार हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली होती. शेतकऱ्यांना मदत देण्यावरून सत्ताधारी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली होती.