सीईओंना रजेवर जाण्याचा सल्ला
By admin | Published: June 2, 2014 12:27 AM2014-06-02T00:27:18+5:302014-06-02T00:27:18+5:30
पालकमंत्री : चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे पदभार देण्यासाठी आग्रह
सोलापूर: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल यांना रजेवर जाण्याचा सल्ला रविवारी देण्यात आला असून, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे पदभार देण्याची मागणी जिल्हा परिषद पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हा परिषदेचा कारभार ढेपाळला असल्याची टीका सातत्याने होत असल्याने पदाधिकारीही वैतागले आहेत. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी तर प्रशासनाच्या नकारार्थी कारभाराला वैतागून राजीनामाच देण्याची घोषणा केली होती. अनेक चांगली कामे करण्याची इच्छा असतानाही प्रशासन हलत नसल्याची टीका अध्यक्षांनी केली होती. अध्यक्षांच्या सुरात सूर अन्य पदाधिकारीही मिसळत असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. उपाध्यक्ष सुभाष गुळवे, सभापती शिवाजी कांबळे, जालिंधर लांडे यांनी पालकमंत्री दिलीप सोपल यांच्याकडे सीईओंचा पदभार मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे देण्याची मागणी केली. याशिवाय पदाधिकारी व सदस्यांच्या सह्यांचे निवेदनच पालकमंत्र्यांना दिले. याशिवाय विभागीय आयुक्तांनाही गुडेवार यांना पदभार देण्याचे निवेदन देण्यात आले. उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी काहीही करून गुडेवार यांच्याकडे पदभार देण्याचा आग्रह धरला. कृषी सभापती जालिंधर लांडे यांनी तर पूर्णवेळ गुडेवार यांनाच घ्या अशी मागणी केली.
---------------------------
सौरदिवे घेऊ नका: दिले पत्र
सौरदिवे खरेदी न करण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतल्याने जि.प. पदाधिकार्यांनी समाधान व्यक्त केले. कृषी, समाजकल्याण, ग्रामपंचायत व अन्य विभागाने एकही सौरदिवा घेऊ नये असे पत्रच पालकमंत्र्यांनी सीईओंना दिले. ग्रामपंचायत ते जि.प., कोणीही सौरदिव्याला पैसे घालवू नका असे त्यांनी सांगितले
. -----------------------
सक्षम अधिकार्याकडे पदभार द्या जिल्हा परिषदेच्या कारभाराची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी गुडेवार यांचीच गरज असल्याचा अट्टाहास जि.प. पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांकडे धरला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सीईओ सिंघल यांना रजेवर (सुट्टी) जाण्याचा सल्ला दिला. अतिरिक्त सीईओ तानाजी गुरव यांचा पदभारही अद्याप कोणाकडे दिला नाही. तो सक्षम अधिकार्यांकडे द्यावा असे पालकमंत्र्यांनी सिंघल यांना सांगितले.
----------------------
पदाधिकार्यांनी गुडेवार यांना पदभार देण्याचा आग्रह धरला आहे. त्यानुसार मी त्यांच्याकडे पदभार देण्याबाबत संबंधितांना बोललो आहे. विभागीय आयुक्त तसेच ग्रामविकास मंत्र्यांशीही बोलणार आहे. - दिलीप सोपल, पालकमंत्री
--------------------------
चुकीचे काम आम्ही सांगत नाही. निकृष्ट व कमी काम करणार्यांची बिले देण्याच्या आम्ही विरोधात आहोत. नियमानुसार काम केलेल्यांना बिल काढताना होणारा त्रास थांबण्याची गरज असल्याने आम्हाला गुडेवार यांची भीती नाही. काम घेऊन आलेल्याला काम झाल्याचे समाधान व्हावे ही अपेक्षा. - शिवाजी कांबळे समाजकल्याण सभापती