सोलापूरातील ‘सेव्हन हिल्स’ अपहारप्रकरणी ‘सीईओ’ ला पोलीस कोठडी, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, तामिळनाडू राज्यातून केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 03:17 PM2018-02-05T15:17:26+5:302018-02-05T15:18:46+5:30
कायदा धाब्यावर बसवून सोलापुरातील मध्यमवर्गीयांकडून कोट्यवधींच्या ठेवी गोळा करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सेव्हन हिल्स कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. विजयकुमार व्यंकटेशअप्पा (वय ३९,रा. कक्कदासम , ता. डेक्कनिकोटा,जि. कृष्णागिरी, राज्य तामिळनाडू) याला तामिळनाडूमधून अटक करुन आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात हजर केले
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ५ : कायदा धाब्यावर बसवून सोलापुरातील मध्यमवर्गीयांकडून कोट्यवधींच्या ठेवी गोळा करुन आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सेव्हन हिल्स कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. विजयकुमार व्यंकटेशअप्पा (वय ३९,रा. कक्कदासम , ता. डेक्कनिकोटा,जि. कृष्णागिरी, राज्य तामिळनाडू) याला तामिळनाडूमधून अटक करुन आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश शैलेश उगले यांनी त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश रविवारी दिला.
सेव्हन हिल्स रिअॅलिटिज प्रा. लि. कंपनी व सेव्हन हिल्स सहकारी संस्था या कर्नाटकातील दोन संस्थांनी सोलापुरात २०१२ ते २०१५ या कालावधीत शाखांमधून विविध योजनांच्या नावाखाली ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या होत्या. मात्र कंपनीने ठेवीदारांना मुदतीनंतर देय असलेल्या ठेवीच्या रकमा परत न करता फसवणूक केली. त्यामुळे पीडित ठेवीदारांपैकी संतोष वसंतराव शिर्के (रा. सम्राट चौक, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी ७ एप्रिल रोजी फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणी विशाल दत्तात्रय मोरे, प्रसाद बाबासाहेब ताड, चेअरमन जी. नारायणअप्पा , एन. प्रसाद, नरसिम्हा रेड्डी, व्ही. विजयकुमार व्यंकटेशअप्पा, डायरेक्टर एकनाथ ढगे, वाय़ आर. मधुसूदन , नागराज रेड्डी, नानजा रेड्डी, टी. राजैह, एच. सिध्दाराजू, रघुवीर नायक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सेव्हन हिल्स विविधोशा सोहार्द को आॅप. लिमिटेड या कंपनीव्दारे पिग्मी योजना, रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट , कल्याण योजना, विद्या योजना , दामदुप्पट योजना अशा विविध योजना तयार करुन त्यात नागरिकांना गुंतवणूक करण्यास लावली. यानंतर परतफेड करणे मुख्य कार्यालयाने बंद केले. डिसेंबर २०१५ पासून सोलापूर येथील शाखा कार्यालयही बंद करुन ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीची रक्कम व मॅच्युरिटी झालेल्या रकमेची परतफेड करणे बंद करुन ठेवीदारांची फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार आणि त्यांच्या पथकाने आरोपी व्ही. विजयकुमार व्यंकटेशअप्पा याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
------------------------
तिघांचा जामीन फेटाळला
- कर्नाटकातील सेव्हन हिल्स कंपनीचा विभागीय व्यवस्थापक रघुवीर नायक (विजयपूर) याच्यासह सोलापूर शाखेचा व्यवस्थापक विशाल मोरे व वरिष्ठ एजंट प्रसाद ताड या अटकेतील तिघा आरोपींना जामिनासाठीचा अर्ज सोलापूरच्या विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एस. आर. उगले यांच्यापुढे ही सुनावणी झाली. आरोपींना जामीन मिळाल्यास ते साक्षी-पुरावे फोडून टाकतील, असा युक्तिवाद सरकारतर्फे अॅड. वामनराव कुलकर्णी यांनी केला तर मूळ फिर्यादीतर्फे अॅड. जयदीप माने यांनी फिर्यादीच्या प्रतिज्ञापत्रासह जामीन अर्जाला प्रखर विरोध करणारे म्हणणे मांडले. याकामी सरकारतर्फे अॅड. वामनराव कुलकर्णी, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. जयदीप माने, अॅड. विकास मोटे यांनी तर आरोपींतर्फे अॅड. प्रशांत नवगिरे,अॅड. व्ही.पी. शिंदे यांनी काम पाहिले.
------------------
जप्त केलेला मुद्देमाल
- सेव्हन हिल्स रिअॅलिटिज प्रा. लि. च्या सोलापूर येथील शाखा नवीपेठ येथील संगणक, कागदपत्रे असा एकूण १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रिमांडदरम्यान एक संगणक संच, रजिस्टर, स्टेटमेंट पोलीस जप्त केले.