सीईओ श्वेता सिंघल नैमित्तिक रजेवर...
By admin | Published: June 21, 2014 01:15 AM2014-06-21T01:15:13+5:302014-06-21T01:15:13+5:30
जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे नव्हे तर स्वत:हून मागणी केली
सोलापूर: ग्रामविकास खात्याने मंजुरी दिल्यानेच जिल्हा परिषदेच्या सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) श्वेता सिंघल या १२ जूनपासून नैमित्तिक रजेवर गेल्या आहेत. जि. प. पदाधिकाऱ्यांच्या मागणीमुळे त्या रजेवर गेल्या नाही तर त्यांनी स्वत: मागणी करुन रजा घेतली आहे. तसा उल्लेख विभागीय आयुक्तांच्या आदेशात आहे.
सीईओ श्वेता सिंघल यांनी ५ जून रोजी दिलेल्या अर्जात १२ जूनपासून रजा मंजूर करावी, असे म्हटले असल्याचे जि. प.च्या पत्रात म्हटले आहे. सिंघल यांनी ५ जून रोजी विभागीय आयुक्तांकडे प्रसूती रजेसाठी अर्ज दिला होता. त्यात त्यांनी केलेल्या मागणीनुसारच १२ जून रोजीपासून रजा मंजूर करुन विभागीय आयुक्तांकडे अंमलबजावणीसाठी पत्र पाठविले होते. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सिंघल या रजेवर गेल्याने त्यांचा पदभार मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे देण्याचा आदेश काढला होता.
श्वेता सिंघल यांना रजेवर पाठवून त्यांचा पदभार मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार गुडेवार यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. मात्र श्वेता सिंघल यांनी ५ जून रोजीच विभागीय आयुक्तांकडे विनंती अर्जाद्वारे देय असलेली प्रसुती रजा १२ जूनपासून मंजूर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार नियमाप्रमाणे त्यांची रजा मंजूर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशात असा कुठेही उल्लेख नाही की जि.प. पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सिंघल त्यांचा पदभार काढला. सिंघल यांनी स्वत:हूनच नैमत्तिक रजा घेतली आहे असल्याचे आदेशात म्हटले आहे.
-------------------------