टक्केवारी प्रकरणात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओंची हयगय; उमेश पाटलांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 05:32 PM2021-10-07T17:32:09+5:302021-10-07T17:32:15+5:30
अध्यक्षांच्या पीएवर अजून कारवाई का नाही; उमेश पाटील यांचा पत्रकार परिषदेत सवाल
सोलापूर: जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अनिल मोटे यांना टक्केवारी मागणाऱ्या अध्यक्षांच्या स्वीय सहायकावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अजून कारवाई का केली नाही असा सवाल राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
कृषी सभापती अनिल मोटे यांनी व्हीडीओचा पुरावा देत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे व त्यांचे स्वीय सहायक सूर्यकांत मोहिते यांनी टक्केवारी मागितल्याचा आरोप केला आहे. अध्यक्ष कांबळे यांच्या संवादात निवडणुकीत झालेला साडेचार कोटीचा खर्च द्यावयाचा आहे असे म्हटल्याचे दिसून येत आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत पैशांचा बाजार मांडला गेल्याचा आरोप झाला होता. राष्ट्रवादीच्या पारड्यात असलेली काही मते विरोधकांनी फोडली होती. याचसाठीया पैशाच्या वापर केला गेला का अशी शंका वाटत आहे. निवडणुकीला ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांनी केलेला खर्च द्यावयाचा आहे असा उल्लेख या संवादात आहे. त्याच्या वसुलीसाठी जिल्हा परिषदेत टक्केवारी मागितली जात आहे का. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच स्वीय सहायक मोहिते हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी असताना सीईओ स्वामी यांनी अद्याप त्यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
तळेकर कोण ?
अध्यक्ष कांबळे यांच्या केबीनमध्ये अजित तळेकर हे बसलेले असतात. त्यांच्या इशारावर अध्यक्षांचे कामकाज चाललेले असते अशी चर्चा आहे. यावरून अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनीही आक्षेप घेतला होता. त्यामुळे तळेकर यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पाटील यांनी केली.