पदवीदान समारंभापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:45 PM2019-08-21T12:45:36+5:302019-08-21T12:47:38+5:30
सोलापूर विद्यापीठ; पीएच.डी.चे प्रबंध आता परदेशातील तज्ज्ञांकडे जाणार
रुपेश हेळवे
सोलापूर : पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचे निकाल लागूनही विद्यार्थ्यांना पदवी मिळवण्यासाठी पदवीदान समारंभाची वाट पहावी लागत होते. यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाºया किंवा लवकर पदवी प्रमाणपत्राची गरज असणाºया विद्यार्थ्यांना मोठी अडचण होत होती. यामुळे पदवीदान समारंभापूर्वी विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाच्या वर्षातील विद्या परिषदेची तिसरी बैठक मंगळवारी विद्यापीठात घेण्यात आली. यात जर्नालिझम अॅन्ड मास कम्युनिकेशन कोर्स कॉलेज स्तरावर सुरू करावे, बीबीएच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी, पदवीदान समारंभापूर्वी पदवी प्रमाणपत्र देणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले़
पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनी निकाल जाहीर होताच जर विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर त्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या अधिकारात प्रमाणपत्रे दिली जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यासाठी विशेष फी आकारली जाणार आहे, पण यामुळे विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे याच बरोबर पीएच.डी.चा प्रबंधही कॉपीसोबत ई-मेलद्वारे मागवला जाणार आहे़ तेही संबंधित संस्थेचा सही-शिक्का करून त्याची स्कॅन कॉपी पीडीएफ स्वरूपात पाठवावी लागणार आहे, अशी माहिती प्ऱ कुलगुरू डॉ़ एस़ आय़ पाटील यांनी दिली़
विद्यार्थ्यांचे प्रबंधही आता ई-मेलद्वारे
- सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आता पीएच.डी.साठी डिजिटल प्रणालीचा उपयोग केला जाणार आहे़ पूर्वी विद्यापीठाच्या वतीने प्रबंध घेताना प्रबंधाच्या ५ कॉपी आणि एक सीडीद्वारे प्रबंध सबमिट केले जात होते़ हे प्रबंध संबंधित तज्ज्ञ व्यक्तींकडे पाठवण्यासाठी जवळपास पंधरा दिवसांचा वेळ लागत होता.
यामुळे विद्यापीठाच्या वतीने यंदापासून विद्यार्थ्यांकडून प्रबंध घेत असताना पीडीएफमधून घेण्यात येणार आहे़ आलेले हे प्रबंध एक गाईड, इतर विद्यापीठातील पण राज्यातील तज्ज्ञ परीक्षक, राज्याबाहेरील तज्ज्ञ परीक्षक आणि यंदापासूनच हे प्रबंध परदेशातील एका तज्ज्ञाकडेही पाठवले जाणार आहेत. यामध्ये परदेशातील तज्ज्ञांचे निरीक्षण आले नाही तरी उर्वरित तिघांच्या निरीक्षणावरून मौकीक परीक्षा म्हणजे व्हायव्हा लावले जातील़ पण गुणवत्तेसाठी परदेशातील तज्ज्ञाने गुणवत्ता सुधारण्यासाठी काही सूचना दिल्या तर त्याही विद्यार्थ्यांना सांगितल्या जाणार आहेत. ही माहिती परदेशातील तज्ज्ञांनाही ई-मेलद्वारेच माहिती पाठवली जाणार आहे़