सोलापुरात साखळी उपोषण सुरूच, बारा गावातील पाचशे जणांचा पायी मोर्चा
By बाळकृष्ण दोड्डी | Published: November 3, 2023 02:06 PM2023-11-03T14:06:42+5:302023-11-03T14:07:01+5:30
मराठा आरक्षणाची धग कायम
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून सोलापुरात मागील दहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या पूनम गेटवर साखळी उपोषण सुरू असून शुक्रवारी सकाळी बारा गावातील पाचशेहून अधिक ग्रामस्थांनी पायी मोर्चा काढत साखळी उपोषणात सहभाग घेतला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर सोलापुरातील दोन युवकांनीही गुरुवारी सायंकाळी आमरण उपोषण स्थगित केले.
बोरमणी ते जिल्हा परिषद पर्यंत पायी मोर्चा काढून अनेकांनी आरक्षणाला पाठिंबा दर्शवला. बोरामणी, तांदुळवाडी, मुस्ती, वडाजी, उले, उलेवाडी गांगेवडी, बक्षी हिप्परगा, कासेगाव, मुलेगाव, खानापूर, कर्देहल्ली,दोड्डी आदी गावातील नागरिकांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. सोलापुरात मराठा आरक्षणाची धग कायम असून साखळी उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.