शुक्रवारी पंढरपुरात चैत्री एकादशीचा सोहळा; दर्शन रांगेत पाणी, मॅट, कुलर, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन, वैद्यकीय सुविधा
By Appasaheb.patil | Published: April 16, 2024 11:55 AM2024-04-16T11:55:22+5:302024-04-16T11:56:06+5:30
Pandharpur Chaitri Ekadashi: चैत्री शुध्द एकादशी शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने आवश्यकती तयारी केली आहे.
- आप्पासाहेब पाटील
पंढरपूर - चैत्री शुध्द एकादशी शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने आवश्यकती तयारी केली आहे. सध्या उन्हाळा सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. यात्रेसाठी येणा-या भाविकांना उष्णतेचा त्रास होवू नये यासाठी मंदीर समितीकडून दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मॅट, कुलर, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन, वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणार आहेत.
चैत्री वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय येऊ नये यासाठी पत्राशेड, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, नगरपालिका या पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश प्रांताधिकारी इथापे यांनी दिले.
दरम्यान, अखंडीत व सुरक्षित विद्युत पुरवठा, अगिनशमन व्यवस्थेसह फिरते आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नदीपात्रात स्वच्छता व पुरेसा प्रकाश राहिल याची दक्षता घेवून, शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी, वाहतुकीस कोणतेही अडचण येवू नये यासाठी शहराबाहेर मोकळया जागेवर वाहन पार्किग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यकतो बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचेही प्रांताधिकारी इथापे यांनी सांगितले.