चैत्री यात्राही भाविकांविना होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:02+5:302021-04-16T04:22:02+5:30
सद्य:स्थितीत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अद्यापही कायम असल्याने चैत्री यात्रेबाबत चर्चा- विनियम करण्यासाठी १५ रोजी श्री विठ्ठल- रुक्मिणी भक्तनिवास ...
सद्य:स्थितीत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अद्यापही कायम असल्याने चैत्री यात्रेबाबत चर्चा- विनियम करण्यासाठी १५ रोजी श्री विठ्ठल- रुक्मिणी भक्तनिवास येथे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरे समितीची ऑनलाइन सभा झाली.
यावेळी सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी किसनगिरी बाबा, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व लेखा अधिकारी सुरेश कदम उपस्थित होते.
सध्या कोरोना संसर्गाचा धाेका वाढत असल्याने शासनाच्या आदेशानुसार ३० एप्रिलपर्यंत विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे, तसेच या कालावधीसाठी राज्यभर कलम १४४ लागू आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता या गोष्टी विचारात घेता, चैत्री यात्रा ही भाविकांविना प्रतीकात्मक व मर्यादित स्वरूपात साजरी करावी.
विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत. त्याच्या स्वरूपात किंवा पद्धतीत कोणत्याही प्रकारचा खंड न पाडता दैनंदिन पूजोपचार चालू ठेवण्यात येत आहेत, तसेच इतर उत्सव परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
घरबसल्या विठ्ठलाचे दर्शन
३० एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावर लाइव्ह दर्शन उपलब्ध आहे, तसेच श्री विठ्ठल- रुक्मिणी देवस्थान या मोबाइल ॲप्लिकेशनवरही उपलब्ध आहे. ॲप गुगल अपस्टोअरवर श्री विठ्ठल- रुक्मिणी देवस्थान या नावाने मोफत उपलब्ध आहे. या माध्यमातून घरबसल्या श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.