स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उद्या राज्यात सर्वत्र चक्का जाम आंदोलन; राजू शेट्टी यांची माहिती
By Appasaheb.patil | Published: February 21, 2023 04:45 PM2023-02-21T16:45:37+5:302023-02-21T16:47:13+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.
सोलापूर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उद्या (बुधवार २२ फेब्रुवारी) राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला असल्याची माहिती माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्न सोडविण्यासाठी ते सोलापुरात आले आहेत, तत्पूर्वी त्यांनी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महावितरण विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळत नाही, कांदा, साखर यासारख्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग तसेच रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या निधी कवडीमोल किंमतीने शासनाकडून संपादित केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी आमची मागणी आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व अडचणी संदर्भात उद्या होत असलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असेही आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना अडचणी येऊ देणार नाही
सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. आमच्या चक्का जाम आंदोलनामुळे बारावी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ देणार नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.