दोन दिवसात पावसाची शक्यता; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ
By शीतलकुमार कांबळे | Published: November 26, 2023 04:06 PM2023-11-26T16:06:21+5:302023-11-26T16:06:40+5:30
सरासरी कमाल तापमान ३४ च्या वर, जिल्ह्यासह राज्यातही पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशतः ढगाळ हवामान होत आहे.
सोलापूर : मागील काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात जितकी थंडी पडायला हवी तितकी न पडता घाम येत असल्याचा अनुभव सोलापूरकरांना येत आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
शहरात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यात आर्द्रतेमुळे उकाडाही अधिक जाणवला. शहरात सकाळी धुके आणि ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. दुपारनंतर आकाश अंशतः निरभ्र होत असले तरी पाऊस सदृष्य वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी थंडी अशी स्थिती आहे.
पुढील दोन दिवस स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासह राज्यातही पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशतः ढगाळ हवामान होत आहे. शहर व जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान ३० ते ४० किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२१ नोव्हेंबर - ३५.०
२२ नोव्हेंबर - ३४.८
२३ नोव्हेंबर - ३४.७
२४ नोव्हेंबर - ३३.२
२५ नोव्हेंबर - ३३.७