विद्यापीठ कुलगुरू निवडीसाठी जूनमध्ये वटहुकूम निघण्याची शक्यता
By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 27, 2023 06:49 PM2023-05-27T18:49:05+5:302023-05-27T18:49:34+5:30
विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नोटिफिकेशन निघाल्यानंतर ३० दिवसांच्या आत इच्छुक उमेदवार अर्ज करतील. आलेल्या अर्जांची छाननी होईल
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन कुलगुरू निवडीसाठी जून किंवा जुलैमध्ये नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे. राज्यपाल भवनकडून नोटिफिकेशन निघणार आहे. नोटिफिकेशन निघाल्यानंतर ३० दिवसांच्या आत इच्छुक उमेदवारांना कुलगुरू पदासाठी अर्ज करता येईल. राज्यपाल भवनच्या चार सदस्यीय उच्चस्तरीय समितीकडून नवीन कुलगुरूंची निवड होणार आहे.
विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार,नोटिफिकेशन निघाल्यानंतर ३० दिवसांच्या आत इच्छुक उमेदवार अर्ज करतील. आलेल्या अर्जांची छाननी होईल. त्यातून १५ ते २० उमेदवारांची निवड होईल. यातून पुन्हा केवळ पाच नावे अंतिम करून सदर नावे राज्यपाल भवनकडे पाठविले जातील. पाच नावांची तपासणी होऊन यातील एक नाव अंतिम करून नवीन कुलगुरूंची घोषणा होईल. ही सर्व प्रक्रिया राज्यपाल भवनच्या चार सदस्य समितीकडून पूर्ण होईल. यात सोलापूर विद्यापीठाकडून म्हणजे अकॅडमी कौन्सिल आणि मॅनेजमेंट कौन्सिलकडून एक सदस्य राहील. यूजीसीकडून एक सदस्य, राज्यपाल भवनकडून एक सदस्य, तसेच शिक्षण विभागाच्या उच्चस्तरीय संचालक असे एकूण चार सदस्य नवीन कुलगुरू निवडीसाठी काम पाहतील.