चंद्रभागेला पूर : पंढरपुरात मंदिरे पाण्याखाली, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 04:09 AM2017-09-16T04:09:55+5:302017-09-16T04:11:07+5:30
उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटामध्ये असणा-या पुंडलिकासह सर्व मंदिरे निम्मी पाण्याखाली गेली असून घाटांना पाणी लागले आहे. व्यासनारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.
पंढरपूर (जि. सोलापूर) : उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटामध्ये असणा-या पुंडलिकासह सर्व मंदिरे निम्मी पाण्याखाली गेली असून घाटांना पाणी लागले आहे. व्यासनारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे.
उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उजनीतून ७० हजार क्युसेक्स तर वीर धरणातून ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे़ त्यामुळे भीमा नदीत सध्या १ लाख १५ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे़ त्यामुळे चंद्रभागेला पूर आला आहे. रात्रीपर्यंत पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून शहरासह नदीकाठच्या गावातील लोकांना देखील सुरक्षितस्थळी हलविण्याच्या तयारी प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात भोगावती व सीना नदीच्या वरच्या भागात जोरदार पाऊस पडल्याने या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. उस्मानाबाद भागातील प्रकल्प पाण्याने भरून वाहू लागले आहेत. हिंगणी मध्यम प्रकल्पातील सांडवा सोडल्यामुळे आणि पावसामुळे भोगावती नदी तुडुंब भरून वाहत आहे.
मराठवाडा, विदर्भातही पाऊस
औरंगाबाद : मराठवाड्यातल परभणी, नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही भागांत दमदार पाऊस झाला. उस्मानाबादेत एकजण वाहून गेला. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस झाला. अकोला शहर व परिसरात सायंकाळी साडेपाचनंतर जोरदार पाऊस झाला. अर्धा तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. चंद्रपूरातही दमदार सरी बरसल्या.
साता-यात मुसळधार घरे अन् दुकानांमध्ये पाणी!
साता-यात शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने गोडोली, सदरबझार परिसरांत हाहाकार माजविला. ओढ्याचे पाणी शेकडो घरे, पन्नासहून अधिक दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. साता-यातील नैसर्गिक ओढ्यांवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. ओढ्यांचा प्रवाह अडवून वसाहती बांधल्या आहेत. त्याचा परिणाम सातारकरांना दरवर्षी सहन करावा लागतो. फलटण तालुक्यात फलटण-बारामती रस्त्यावरील सोमंथळी पूल रात्री उशिरा वाहून गेला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.