चंद्रकांत गुडेवार राजीनामा-नागरी प्रतिक्रीया
By admin | Published: May 5, 2014 10:19 PM2014-05-05T22:19:01+5:302014-05-06T17:08:47+5:30
प्रा. नरेंद्र काटीकर
प्रा. नरेंद्र काटीकर
कर्तव्यदक्ष अधिकारी वेगळी ध्येये घेऊन काम करीत असतात, त्यांना सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. सत्ताधार्यांनी आतापर्यंत त्यांच्याकडे असलेल्या कालावधीत निर्णय क्षमता न वापरल्याने त्यांची अकार्यक्षमता दिसून येत आहे. या उन्हाळ्यात ज्या त्या भागातील जनतेचा दबाव वाढल्याने सत्ताधार्यांनी आंदोलनाचे नाटक केले आहे. यामुळे एका उत्कृष्ट कार्यक्षम प्रशासकाला सोलापूर मुकणार आहे. अशा प्रवृत्तीला प्रतिसाद देणार्यांनी त्यांचे काम निर्भीडपणे चालू ठेवावे राजीनामा मागे घेऊन कामाला लागावे. सोलापूरकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
प्रा. संजीव जमगे
चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापूरला एक शिस्त लावली आहे. पाणी पुरवठ्याबद्दल मनुष्यबळ आणि तांत्रिक अडचणी असल्यामुळे विस्कळीतपणा आला आहे. प्रामाणिक अधिकार्याला खोटी आश्वासने देता येत नाहीत. मनपाची बाजू मजबूत करण्याकरिता त्यांनी रास्त मार्गाचा अवलंब केला होता. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी मदत करीत आहेत, सोलापूरकरांना गुडेवार यांच्यासारख्या आयुक्तांची गरज आहे.
प्रा. डॉ. संजय सरसमकर
महापालिकेतील लोकप्रतिनिधींनाच चांगले अधिकारी नको आहेत. त्यामुळे असे अधिकारी हतबल होऊन निघून जाण्यात धन्यता मानतात़ हा प्रकार थांबला पाहिजे. जनता जागृत होऊन अशा प्रवृत्तींचा बिमोड केला पाहिजे. यापूर्वी सोलापूर शहराला लाभलेले पोलीस आयुक्त स्व. अशोक कामटे यांना लोकांनी डोक्यावर घेतले होते. तसेच गुडेवारांच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे. गुडेवार यांना राजीनामा देण्यास प्रवृत्त करण्यास भाग पाडणार्या सत्ताधार्यांचे फार मोठे अपयश आहे.
प्रा. डॉ. नितीन ग्रामोपाध्ये
कर्तव्यदक्ष अधिकारी काम करीत असताना ते नेहमी चौकटीत राहून काम करीत असतात. या गोष्टींचा काही लोकांना त्रास होत असतो. याचा राग मनात धरून सत्ताधार्यांमधील काही मंडळी गुडेवारांसारख्या अधिकार्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र नेहमी सत्याचा विजय होत असतो. गुडेवार हे सत्याची बाजू धरून चालणारे व एक शिस्तप्रिय अधिकारी आहेत. त्यांनी राजीनामा देऊन अशा लोकांपासून दूर जाणे म्हणजे कर्तव्यापासून पळ काढण्यासारखे आहे. या लोकांचा खंबीरपणे सामना करण्याची गरज आहे. कोणी नाही तर जनता तरी त्यांच्यामागे ठामपणे उभी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे.
ब्रादेव पांढरे
शहराला शिस्त लावण्यासाठी महापालिकेचे काही नियम आहेत, त्या नियमात राहून काम करीत असताना सत्तेच्या जोरावर नियम बदलणार्या लोकांना चंद्रकांत गुडेवारांसारख्या अधिकार्यांचा त्रास होणे साहजिक आहे. सत्य नेहमी कडवट असते, लोकांच्या भावना जरी तीव्र होत असल्या तरी इतके दिवस सत्तेत असलेल्या नगरसेवकांना पाण्याचा प्रश्न का समजला नाही. गुडेवार यांच्याच कालावधीत हा प्रश्न इतका तीव्र कसा होत आहे. हे सर्व राजकारण आहे यामुळे कर्तव्यदक्ष अधिकार्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे शहराच्या विकासासाठी योग्य नाही.
सुधीर जोगीपेठकर (जनसंपर्क अधिकारी)
बदलत्या सोलापूरची प्रतिमा उंचावत असताना पुन्हा एकदा भुतकाळाचा ठपका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या राजीनाम्यामुळे पडत आहे. विकासाची उंची गाठण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असताना सोलापूरकरांच्या अनेक अशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गुडेवारांच्या राजीनाम्यामुळे चांगल्या कामाला आळा घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. ही गोष्ट सोलापूरच्या इतिहासात माफी देण्यालायक ठरणार नाही.
प्रा. शशिकांत राजमाने
नियमात राहून काम करणार्या अधिकार्याला राजीनामा देण्याची वेळ आली ही बाब भूषणावह नाही. त्यांचा राजीनामा मान्य होऊ नये. लोकांचा रेटा लक्षात घेता शासनाने पुन्हा त्यांना सोलापूरकरांच्या सेवेसाठी पाठवावे. चंद्रकांत गुडेवार यांनी तडकाफडकी घेतलेला निर्णय योग्य नाही, चांगले काम करीत असताना असे अनुभव येत असतात. याला न जुमानता त्यांनी काम केले पाहिजे, प्रसंगी जनता त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरेल. जनता त्यांच्या पाठीशी आहे, इतकेच गुडेवार यांनी लक्षात ठेवावे.