चंद्रकांत पाटलांनी घेतली सुशीलकुमार शिदेंची भेट; जाणून घ्या नेमकं कारण
By Appasaheb.patil | Published: January 17, 2024 05:25 PM2024-01-17T17:25:03+5:302024-01-17T17:26:32+5:30
माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची घेतलेली भेट थोडी चर्चा करणारीच ठरत आहे.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : राज्याचे मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंदक्रांत पाटील हे आजपासून तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना भेटी देणार आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापुरात होत असलेल्या कार्यक्रमांलाही ते उपस्थित राहणार आहेत. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असताना चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची घेतलेली भेट थोडी चर्चा करणारीच ठरत आहे.
सोलापूर ही नाट्य चळवळीची नगरी असून यंदाच्या वर्षी होत असलेल्या १०० व्या विभागीय नाट्य संमेलन आयोजनाची मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी सोलापूरच्या नाट्य रसिकांवर आलेली आहे. ती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आहेत. बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी भेट घेऊन नाट्य संमेलनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे सुशीलकुमार शिंदेंना भाजपाने ऑफर दिल्याचे खुद्द शिंदे यांनीच दोन दिवसापूर्वी सांगितले होते, त्याला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही कोणतीही ऑफर सुशीलकुमार शिंदेंना दिली नव्हती असे सांगितले आहे. एकूणच लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील व सुशीलकुमार शिंदे यांची भेटीमुळे राजकीय चर्चां मोठया प्रमाणात होऊ लागली आहे.