आजपासून सोलापुरातील राष्ट्रीय बँकांच्या वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:26 PM2019-11-01T12:26:51+5:302019-11-01T12:32:45+5:30
जाणून घ्या कसा असणार आहे बँकांचे वेळापत्रक; तीन सत्रात सुरू राहणार बँका
सोलापूर : केंद्र शासनाने राष्ट्रीय बँकांच्या वेळात बदल केला असून, खातेदारांसाठी तीन सत्रात बँका सुरू राहतील. याची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून होणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी दिली.
वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधित शाखा, लोकवस्तीचा विचार करून बँकांच्या वेळा ठरविण्यात आल्या असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. रहिवासी क्षेत्रातील बँकांच्या शाखा या खातेदारांसाठी सकाळी ९ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. व्यावसायिक, व्यापारी तसेच मार्केटच्या ठिकाणच्या शाखांची खातेदारांसाठी वेळ ही सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे. अन्य ठिकाणच्या शाखा व मुख्य कार्यालय सकाळी १० ते सायंकाळी चार वाजेपर्यंत खातेदारांसाठी सुरू राहणार आहे.
देशभरातील व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक, नोकरदार व अन्य प्रकारच्या खातेदारांच्या मागणीचा विचार करुन हा बदल केला असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. इंडियन बँक असोसिएशनने घेतलेल्या निर्णयाची जिल्ह्यातील सर्व राष्टÑीय बँका व त्यांच्या शाखा पालन करतील असे त्यांनी सांगितले.
खातेदारांची अडचण येणार नाही अशा पद्धतीने जेवणासाठी सुट्टीची वेळ ठरविली जाणार आहे. काही बँकांच्या शाखा जेवणाची सुट्टी न घेता सलग बँक सुरू ठेवतात. सकाळी ९ वाजता खातेदारांना सेवा देणाºया शाखेत जेवणासाठी वेळ वेगळी तर ११ वाजता सेवा देणाºया शाखेची जेवणाच्या सुट्टीची वेळ वेगळी राहील.
- संतोष सोनवणे
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक