बदलती सामाजिक मानसिकता धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक : जितेंद्र आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:30 PM2019-02-15T14:30:33+5:302019-02-15T14:32:16+5:30
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक ...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी देश बदलत असल्याचा नारा देत आहेत. पण हा देश बदलत नसून देशातील लोकांची सामाजिक मानसिकता बदलत आहे. ती या धर्मनिरपेक्ष देशासाठी घातक आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
येथील जवाब दो आंदोलन कृती समितीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवछत्रपती रंगभवन येथे गुरुवारी सायंकाळी सांस्कृतिक दहशतवादविरोधी परिषद घेण्यात आली. या परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक सर्फराज शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कॉम्र्रेड रवींद्र मोकाशी होते.
आव्हाड यांनी सुरुवातीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. काश्मिर देशातील राजकारणाचा भाग झाला आहे. मोदी सरकारने काश्मिरी युवकांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. उलट या भागात सामाजिक अस्वस्थता वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.
काश्मिर वाचविण्यासाठी जे जे करता येईल ते करायला हवे. नरेंद्र मोदी इस्राईलला गेले. मुंबई हल्ल्यातून वाचलेल्या लहान मुलाला भेटले. पण उत्तर प्रदेशातील अखलाक किंवा पोलीस निरीक्षक सुबोधसिंग याच्या मुलाला भेटले नाहीत. सोलापुरातील मोहसीन शेखच्या कुटुंबीयांना भेटायला आले नाहीत. दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधान जाळण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हे सर्व ठरवून केले जात आहे. सातत्याने संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे.
तर मीही अर्बन नक्षलवादी...
- आव्हाड म्हणाले, अत्यंत क्रूर पद्धतीने शासन व्यवस्था चालविली जात आहे. अर्बन नक्षलवादी म्हणून आंबेडकरी चळवळीला बदनाम केले जात आहे. येथील वर्णव्यवस्थेत पिचलेल्यांच्या बाजूने बोलणं जर अर्बन नक्षलवाद असेल तर मला अर्बन नक्षलवादी म्हणून घ्यायला काहीही वाटणार नाही. ही बदनामी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असल्याचेही त्यांनी सांगितले.