बदलतं सोलापूर-बदलता उत्सव ; मोदी भागातील सहा शिवजन्मोत्सव मंडळे येणार एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 04:52 PM2019-02-09T16:52:56+5:302019-02-09T16:55:51+5:30
सोलापूर : सात रस्ता परिसरातील मोदी भागातील सहा शिवजन्मोत्सव मंडळे यंदा प्रथमच एकत्र येऊन बदलतं सोलापूर -बदलत्या उत्सवाची जणू ...
सोलापूर : सात रस्ता परिसरातील मोदी भागातील सहा शिवजन्मोत्सव मंडळे यंदा प्रथमच एकत्र येऊन बदलतं सोलापूर-बदलत्या उत्सवाची जणू प्रचिती दिली आहे. एरव्ही सात रस्ता परिसरातच मिरवणुका काढणारी ही सहाही मंडळे एकत्रित शिवजयंती साजरी करताना मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीत २०० जणांचे लेझीम पथकही असणार आहे. शिवप्रेमी मंडळांच्या या निर्णयाचे महामंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोडगे यांनी स्वागत केले आहे.
जयशंकर शिवजन्मोत्सव मंडळ, छत्रपती शिवजन्मोत्सव मंडळ, ओंकार शिवजन्मोत्सव मंडळ, जय शिवशक्ती शिवजन्मोत्सव, जय भवानी शिवजन्मोत्सव आणि जय हिंद तालीम शिवजन्मोत्सव मंडळ ही सहाही मंडळे एकत्रित शिवजयंती साजरी करणार आहेत.
दरवर्षी ही सहाही मंडळे स्वतंत्ररित्या शिवजयंती साजरी करताना मिरवणुकाही स्वतंत्रपणे काढायच्या. त्यामुळे मिरवणुका आणि अन्य बाबींवर चांगलाच खर्च व्हायचा. शिवाय ध्वनिप्रदूषणाचाही विचार करुन ही मंडळे एकत्रित शिवजयंती साजरी करून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे. विजय पोखरकर आणि प्रकाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच मंडळांच्या पदाधिकाºयांनी, कार्यकर्त्यांनी एक चांगला पायंडा यंदाच्या शिवजयंती उत्सवाआधीच पाडला आहे.
अध्यक्षपदी रुपेश भोसले यांची निवड
४मोदी येथील जय हिंद तालीम शिवजन्मोत्सव मंडळाच्या नावाखाली शिवजयंती साजरी करण्यात येत असून, तिच्या अध्यक्षपदी रुपेश भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. अन्य पदाधिकारी असे- उपाध्यक्ष- संतोष कदम, सुमित (बंटी) काकडे, मयूर यमगवळी, महेश नवले, मिरवणूक प्रमुख- मनोज (टिपू) घाटे, राकेश शेजेराव, अमर नायकू, नागा भंडारी, सचिव- अभिषेक नवले, विनायक नांदकिले, सोनू कांबळे, सोशल मीडियाप्रमुख- ऋषिकेश कदम, ऋषिकेश जगताप, ऋषिकेश नवले.
मोदी ते शिवाजी चौकापर्यंत मिरवणूक
४शिवजयंतीनिमित्त एकत्र आलेले हे मंडळ मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या मिरवणुकीत दिसणार असून, मंगळवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मोदी भागातील गणपती मंदिरापासून मिरवणुकीची सुरुवात होईल. तेथून ही मिरवणूक पाच कंदील चौक, अष्टभुजा मंदिर, मोदी पोलीस चौकी, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौकमार्गे पुढे मध्यवर्तीच्या मिरवणुकीत सहभागी होईल. तेथून पार्क चौक, नवीवेस पोलीस चौकी आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास एक फेरी मारुन मंडळाचे पदाधिकारी, सदस्य अभिवादन करतील, असे अध्यक्ष रुपेश भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राजा शिवछत्रपतींचा जयंती उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी सहा मंडळांना एकत्र करण्याचा योग आला. आजपर्यंत कधीही मध्यवर्तीच्या मिरवणुकीत सहभाग नसायचा. २०० कार्यकर्ते लेझीमचा उत्कृष्ट खेळ सादर करुन मिरवणूक रंगतदार करतील.
-विजय पोखरकर,
मार्गदर्शक- जय हिंद तालीम शिवजन्मोत्सव, मोदी विभाग.